राहाता : दिल्लीहून निघालेले विमान शिर्डीमध्ये उतरणार होते. मात्र खराब हवामानामुळे ‘लँडिंग’ची परवानगी न मिळाल्याने हे विमान हवेतच घिरट्या घालत होते. घिरट्या घालताना हे विमान नाशिकच्या येवला व वैजापुर तालुक्यातील पूर्व भागात अतिशय कमी उंचीवर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर विमानाचे आपत्कालीन ‘लँडिं’ग सुरत विमानतळावर करण्यात आले. त्यानंतर विमानातील प्रवाशांसह येवला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

काल, सोमवारी रात्री आठच्या सुमारास हा थरार घडला. इंडिगो कंपनीचे ‘आयजीओ-६९१ वाय’ हे विमान दिल्लीहून शिर्डीकडे सोमवारी रात्री येत होते. मात्र खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे शिर्डी विमानतळावर त्याचे लँडिंग शक्य झाले नाही. यानंतर विमानाला येवला आणि वैजापूर परिसरात हवेतच ‘होल्ड’वर ठेवण्यात आले.

विमान खूपच खाली उडत असल्यामुळे येवला (नाशिक) व वैजापूर (छत्रपती संभाजीनगर) परिसरातील स्थानिक नागरिक घाबरले होते. बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही हवामानात सुधारणा न झाल्याने आणि इंधनाचा विचार करून पायलटने विमान सुरतला वळवले. इंधन भरल्यानंतर रात्री उशिरा ११ वा. विमान पुन्हा शिर्डी विमानतळावर उतरले. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. विमान १८० प्रवासी क्षमतेचे असुन त्यात १६७ प्रवासी दिल्लीवरून शिर्डीला येत होते तर १४१ प्रवासी शिर्डीहून दिल्लीला सोमवारी रात्री ११.३० रवाना झाले. सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

आपत्कालीन यंत्रणेला दूरध्वनी केल्यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी तात्काळ शिर्डी व नाशिक हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता या विमानाचे आपत्कालीन ‘लँडिंग’ सुरत विमानतळावर करण्यात आल्याने विमानातील प्रवाशांसह येवला तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

खराब हवामानामुळे सुरतला उतरवले

काल, सोमवारी रात्री ढगाळ वातावरणामुळे, हवामान खराब असल्याने विमान उतरण्यास अडचण आल्याने वैमानिकाने सुरक्षेच्या कारणास्तव विमान सुरत येथे सुरक्षित उतरवले व पुन्हा शिर्डी येथे आल्यावर शिर्डीतील प्रवासी त्याच विमानाने दिल्लीकडे रवाना झाले. – कृष्णा पाॅल, संचालक, शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळ.