डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या उपचारावरून वाद निर्माण झाला होता. या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या घटनेत शिवसेनेचे( शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह काही जणांनी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली. मानपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नगरसेवकाचं पद काढून घ्या आणि त्याची कल्याण डोंबिवलीत धिंड काढा अशी मागणी मी करतो आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी काय मागणी केली?

मी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली आहे की डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रे या मिंधे गटाच्या नगरसेवकाला फक्त अटक करुन थांबू नका, त्याचं पद काढून घ्या. तसंच त्याची कल्याण डोंबिवलीतून धिंड काढा. ज्यामुळे सगळ्यांना समजेल की की कुणीही अशा पद्धतीने डॉक्टरांना मारहाण करु शकत नाही. मग ती महिला डॉक्टर असो, पुरुष डॉक्टर किंवा परिचारिका. नगरसेवक अशा पद्धतीने हात उचलू शकत नाही. डॉक्टरांची या प्रकरणात गरोदर महिलेला दुसऱ्या रुग्णालयात जा असं विनंती करत सांगितलं होतं कारण त्यांच्याकडे तेवढी व्यवस्था नव्हती. इतर रुग्णही दाखल होते. या महिलेची मुदतपूर्व प्रसूती झाली तर त्या महिलेला NSIU बेड लागला असता. तो या रुग्णालयात उपलब्ध नव्हता. यामध्ये त्या डॉक्टरांचं काय चुकलं? तरीही त्यांना मारहाण करण्यात आली. आता प्रश्न असा आहे की या नगरसेवकाला अटक करायची असेल, पदावरुन काढायचं असेल तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ती कारवाई करतील का? कारण त्यांचे हात बांधले गेले आहेत. तसंच केंद्रातील भाजपा फेकनाथ मिंधेंना पाठिंबा देते फडणवीसांना नाही असं म्हणथ आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

नगरसेवक रमेश म्हात्रेंचं म्हणणं काय?

डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महिला डॉक्टरवर हात उचलल्याचा आरोप फेटाळून लावला. रुग्णाच्या नातेवाईकांची तक्रार ऐकण्याऐवजी डॉक्टर दूरध्वनीवर बोलत असल्याने तिच्या हातावर फटका मारल्याचे त्यांनी सांगितले. महिला डॉक्टरला मुलीसारखे मानत असून महिलांवर हात उचलण्याची शिकवण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.