हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील आठ गावांतून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून, त्या गावांतील शेतकऱ्यांचा महामार्गास विरोध आहे. महामार्गामुळे शेतकरी उद्ध्वस्त होतील. महामार्गाऐवजी सिंचन अनुशेष दूर करावा, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली.
परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीसह शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले, की कळमनुरी तालुक्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग पूर्णतः बागायती जमिनीतून प्रस्तावित आहे. पूर्णा प्रकल्प व अप्पर पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील या जमिनीत हळद, केळी आदी पिके घेतली जातात. यातील काही पिकांची निर्यातही होते. शक्तिपीठ महामार्गामुळे या शेतकऱ्यांना स्थलांतराशिवाय पर्याय राहणार नाही. आधीच हिंगोलीची ओळख ‘ना उद्योग जिल्हा’ अशी आहे. शक्तिपीठ महामार्गाऐवजी जिल्ह्याच्या सिंचनाचा अनुशेष भरून काढावा.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष डॉ. रामदास धांडे, तालुकाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते, दिलीप खोडके, अरुण वाढवे, ॲड. गुणानंद पतंगे यांच्यासह शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे.