उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका

कर्जत : एसटी महामंडळाची स्थापना होऊन साठ झाली आहेत मात्र या काळात कधीही या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी केली नाही. नेमकी याचवेळी ते भाजपच्या माध्यमातून जाणीवपूर्वक हा प्रश्न उपस्थित करत असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत येथे बोलताना केली.

कर्जत तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.  या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, दत्ता भरणे, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनीषा गुंड, कपिल पाटील, घनश्याम शेलार उपस्थित होते.

 पवार म्हणाले की, गेल्या साठ वर्षांमध्ये कधीही एसटीचा विलीनीकरणाचा प्रश्न उपस्थित केला गेला नाही. कामगारांकडून प्रथमच ही मागणी लावून धरली जात आहे. या साऱ्यामागे भाजप असून ते जाणीवपूर्वक हे आंदोलन घडवत आहेत. विरोधकांच्या या राजकारणामध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये असे आवाहन पवार यांनी केले.

शिवसेनेचा बहिष्कार

महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे शिवसेनेला विश्वासात न घेता येथे कारभार करत असल्यामुळे या कार्यक्रमावर शिवसेनेच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला. एवढेच नव्हे तर शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार  हे कार्यक्रमाला येत असताना शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांच्याकडे शिवसेनेला मिळत असलेल्या दुजाभावाबद्दल तक्रारही केली.