जनजागृती ग्राहक मंचावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अलिबाग तालुका रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. जनजागृती ग्राहक मंच अलिबागमधील रेशन दुकानदारांची नाहक बदनामी करत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याबाबतचे लेखी निवेदन रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
   जनजागृती ग्राहक मंचाने रायगड जिल्ह्य़ातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून रेशन व्यवस्थेतील काळाबाजार समोर आणण्यास सुरुवात केली आहे. वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी जागो शासक अभियानही छेडले आहे. जनजागृती ग्राहक मंचाच्या पाठपुराव्यामुळे वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी दक्षता समित्यांच्या रखडलेल्या नेमणुका सुरू झाल्या आहे, यामुळे वितरण व्यवस्थेतील धान्य वितरणावर या कमिटय़ा लक्ष ठेवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणाली आणि जनजागृती ग्राहक मंचात मात्र चांगलीच जुंपली आहे. रेशन दुकानदारांनी एकत्र येऊन आता जनजागृती ग्राहक मंचाविरोधात दंड थोपटले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना लेखी तक्रार देऊन आपला रोष त्यांनी व्यक्त केला आहे.  
   जनजागृती ग्राहक मंचाकडून गेल्या ५ ते ६ वर्षांपासून अलिबागमधील रेशन दुकानदारांबद्दल गैरसमज पसरवले जात आहेत. शासनाकडून येणारे धान्य रेशन दुकानदार काळ्याबाजारात विकत असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांवर स्थानिक जनता विश्वास ठेवत आहे. याचा परिणाम म्हणून दुकानदारांना लोकांच्या रोषाला सामोर जावे लागत आहे. रेशन दुकानदारांना गावात राहणेही कठीण झाले आहे. रेशन दुकानदारांनी जनजागृती ग्राहक मंचाच्या कार्यालयात जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र दुकानदारांनी ठरावीक रक्कम दिल्यास कारवाई थांबवू, असा गंभीर आरोपही दुकानदारांनी केला आहे.
 जनजागृती ग्राहक मंचाने ग्राहकांच्या रेशन कार्डाच्या झेरॉक्स आणि सह्य़ा घेऊन पैसे उकळण्याचा उद्योग सुरू केला असून, जनजागृती ग्राहक मंचावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली आहे.