महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे सांगितले असले तरी भाजपा राज्यामध्ये छोटय़ा राज्यांच्या निर्मितीचे समर्थन करीतच राहणार असल्याचे सांगत स्वतंत्र विदर्भाचे समर्थन पक्षप्रवक्ते माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना केले. सार्वमत घेण्याची शरद पवार यांची सूचना म्हणजे नवे भांडण लावून देण्याचा प्रकार असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यात मोदींची अद्याप लाट असल्याचे सांगत भंडारी म्हणाले की, आघाडी शासनाच्या कारभाराला लोक विटले असून या निवडणुकीत भाजपाला राज्यात पूर्ण बहुमत मिळेल. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची साथ घेण्याची वेळच येणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला चांगले यश मिळणार असून राज्याच्या राजकारणात मातब्बर समजल्या जाणाऱ्या नेत्यांना त्यांच्याच मतदार संघामध्ये गुंतवून ठेवण्यात भाजपा यशस्वी ठरला आहे.
निवडणुकीच्यावेळीच भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाल्याच्या आरोपाचे खंडण करताना भंडारी म्हणाले की, १९२५ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये शिवराज्याभिषेक साजरा करण्यात येतो. संघाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये असणाऱ्या तीन प्रतिमांमध्ये शिवाजी महाराजांची एक प्रतिमा असते. शरद पवार उल्लेख करीत असलेले गुजरातमधील इतिहासाचे पुस्तक ६ महिन्यापूर्वीच मागे घेण्यात आले आहे. मात्र एनसीइआरटीच्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल केवळ ७ ओळींचा उल्लेख आहे, याबाबत पवार यांच्याकडे दुरूस्तीची मागणी केली असतानाही कृती झाली नाही. मोदी सरकार यासह यूजीसीच्या इतिहासात सुधारणा करणार आहे.
प्रशासनाच्या सोईसाठी छोटय़ा राज्यांची निर्मिती करण्यात यावी असा ठराव केंद्रीय समितीने केला असून तो कायम आहे. महाराष्ट्रात किती राज्ये व्हावीत याबाबत छेडले असता, मागणी येईल त्याप्रमाणे विचार व्हावा असेही त्यांनी सांगितले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये १०५ हुतात्मे काँग्रेसच्या कारकिर्दीत झाले असून त्याबाबत काँग्रेसने अद्याप माफी मागितलेली नसून मुंबई केंद्रशासित करावी, असा तत्कालीन प्रदेश समितीने केलेला ठराव कायम असल्याकडेही त्यांनी या वेळी लक्ष वेधले.