MBA झालेल्या पायल झांबरे या विवाहित तरूणीचा मृत्यू पुण्यातल्या मुकुंद नगर भागात झाला. तिने सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं आहे. पायलच्या माहेरच्यांनी झांबरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. तर तिच्या सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल केला आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं, हुंड्यासाठी छळ, घरगुती हिंसाचार ही कलमं त्यांच्यावर लावण्यात आली आहेत. आज पायलच्या सासू सासऱ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. अद्याप तिची नणंद फरार आहे. दरम्यान पायलच्या माहेरच्या लोकांनी कोर्टाच्या बाहेर आंदोलन केलं. या प्रकरणातील दोषी आरोपींना फाशी दिली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
पायलच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आऱोपींना फाशी देण्याची मागणी
पायल पवार-झांबरे यांचे नातेवाईक कोर्टाबाहेर जमले आहेत. त्यांनी आंदोलन करत या पायलच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना फाशी द्या अशी मागणी केली आहे. आरोपींना फाशी द्या हीच आमची मागणी आहे असं पायलच्या नातेवाईकांनी म्हटलं आहे. पायलच्या नात्यातील महिलेने सांगितलं हुंडाबळीची पुण्यातली ही सहावी घटना आहे. मात्र सहा बळी जाऊनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. हा पायंडा सरकार का पाडतं आहे? फास्ट ट्रॅक कोर्टात हा लढा लढला गेला पाहिजे आणि आरोपींना फासावर लटवकलं गेलं पाहिजे जेणेकरून घरातल्या सुनांना अशी वागणूक देणाऱ्यांमध्ये एक संदेश जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. पायल झांबरेला न्याय मिळावा म्हणून जे आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलकांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.
पायल झांबरेच्या भावाने काय म्हटलं आहे?
पायलने शेवटचा मेसेज मला केला होता. या प्रकरणी चौथा आरोपी अजूनही फरार आहे. तिला मुलगी झाली तेव्हापासून तिचा छळ वाढला होता. मुलगाच झाला पाहिजे ही झांबरे कुटुंबाची मागणी होती. मी तिला समजावलं होतं की तू आमच्याकडे ये आणि आमच्याकडेच राहा. पण ती म्हणायची की मी सगळी परिस्थिती सांभाळून घेईन असं म्हणायची असं पायलच्या भावाने सांगितलं आहे.
वारंवार हुंडाबळीच्या घटना, आरोपींना जामीन कसा मिळतो?
वारंवार हुंडाबळीच्या घटना पुण्यात, महाराष्ट्रात घडत आहेत. तरीही आरोपींना जामीन कसा मिळतो. पायल उच्च शिक्षित होती तरीही तिचा छळ केला गेला, तिला जीव द्यावा लागला. पायलसारख्या मुलीला जीव द्यावा लागतो आधीही मुलींचे जीव गेले आहेत. तरीही न्याय का मिळत नाही? असा प्रश्न आंदोलनकर्त्या महिलेने विचारला आहे. जस्टिस फॉर पायलचे बोर्ड घेऊन महिला आणि पायलचे नातेवाईक या मोर्चात सहभागी झाले होते.
