जालना : सध्या प्रस्तावित असलेला औरंगाबाद येथील वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहती दरम्यानचा मेट्रो रेल्वे मार्ग पुढे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत न्यावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केली असतानाच आणखी आजी-माजी लोकप्रतिनिधींनी या मागणीची री ओढली आहे. 

महामेट्रोच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यात वाळूज ते शेंद्रा औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते हर्सुलदरम्यान दोन मेट्रो रेल्वे मार्ग प्रस्तावित आहेत. हा प्रस्ताव सध्या विचाराधीन असून त्या संदर्भातील तपशीलवार प्रकल्प अहवालास (डीपीआर) आणखी काही महिने लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर खोतकर म्हणाले, शेंद्रा येथील औद्योगिक वसाहत आणि जालना येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीदरम्यान जवळपास ३५ किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे प्रस्तावित मेट्रो रेल्वेमार्ग पुढे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत नेणे सयुक्तिक ठरणार आहे.  जालना जिल्ह्याचा ८० टक्के भाग पूर्वी औरंगाबाद जिल्ह्याचाच भाग होता. जालना आणि औरंगाबाद शहरांमध्ये दैनंदिन दळणवळण मोठ्या प्रमाणावर असते. जालना औद्योगिक वसाहतीचा तिसरा टप्पा आता विकसित झालेला आहे. या वसाहतीमधील कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वाळूज आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीच्या दरम्यान महामेट्रोच्या माध्यमातून मेट्रो रेल्वे मार्ग टाकण्याचा डीपीआर तयार करताना तो तेवढ्या मर्यादेतच ठेवू नये. तर ही मेट्रो रेल्वे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत नेण्याचा विचार करून डीपीआर तयार करावा, अशी अपेक्षा खोतकर यांनी व्यक्त केली.

Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

दोन्ही शहरे जवळची  आपण दोन वेळेस जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्या वेळी भविष्यात जालना आणि औरंगाबाद ही जुळी शहरे होतील, असे मत व्यक्त केले होते. व्यापार-उद्योग आणि अन्य क्षेत्रांच्या अनुषंगाने या दोन्ही शहरांचा दररोजचा जवळचा संबंध आहे. वाळूजे ते शेंद्रा औद्योगिक वसाहतीपर्यंत मेट्रो रेल्वे मार्गाचा प्रस्ताव आहे. परंतु ही मेट्रो रेल्वे पुढे जालना शहरापर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनेच या मेट्रो रेल्वेचा विचार आवश्यक असून तशी मागणी आपण केलेली आहे.

– उत्तम सिंग पवार, माजी खासदार-जालना

डीपीआरमध्ये विचार करावा  विकासाच्या संदर्भात दळणवळणांच्या साधनांना महत्त्व असते. जालना आणि औरंगाबाद शहराचा संबंध उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य सुविधा इत्यादी अनेक संदर्भात दररोज येतो. जालना औद्योगिक वसाहत आणि शेंद्रा औद्योगिक वसाहतीचे अंतर आता फार राहिलेले नाही. जालना शहराजवळ ड्रायपोर्टही उभारले जात आहे. त्यामुळे वाळूज ते शेंद्रा दरम्यानची प्रस्तावित मेट्रो रेल्वे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत नेण्याची आवश्यकता आहे. डीपीआर तयार करताना हा विचार आवश्यक आहे.

– भास्कर अंबेकर, माजी नगराध्यक्ष-जालना

जालना व औरंगाबाद ही दोन्ही शहरे दैनंदिन व्यवहारात एकमेकांशी जोडलेली आहे. जालना जिल्ह्याची सीमा शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून जवळपास १५ किलोमीटरवर आहे. प्रस्तावित वाळूज-शेंद्रे मेट्रो रेल्वे जालना औद्योगिक वसाहतीपर्यंत झाली तर बदनापूर शहर आणि त्या तालुक्यासही फायदा होईल. त्यामुळे वाळूज औद्योगिक वसाहत ते जालना दरम्यान मेट्रो रेल्वे मार्ग होण्याची आवश्यकता आहे. यामुळे जालना- औरंगाबाद दरम्यानची दैनंदिन प्रवासी वाहतूक सोयीस्कर होईल.

– अरविंद चव्हाण, माजी आमदार-बदनापूर