राहाता: कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगांव येथील विवाहिता अर्चना शिंगाडे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या स्त्री रोग तज्ञावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिंगाडे कुटुंबीय आणि सकल आंबेडकर समाजाने आज, मंगळवारी कोपरगावच्या तहसीलदारांना निवेदन देऊन केली. यावेळी संबंधित डॉक्टरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मृत महिलेचा पती माधव शिंगाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, अर्चना माधव शिंगाडे गरोदर असताना त्यांच्यावर उपचार चालू होते. २२ मे रोजी नियमित तपासणीत डॉक्टरांनी सोनोग्राफि केली. गर्भाची वाढ व्यवस्थित झाली नाही व गर्भ वाढीसाठी २० दिवसाच्या गोळया दिल्या. या गोळ्या घेतल्यानंतर अर्चना यांना रक्तस्त्राव चालु झाला व पोटात दुखु लागले. २५ मे रोजी पुन्हा डॉक्टरकडे तपासणीस नेले असता डॉक्टरने सोनोग्राफि केली, गर्भाच्या भोवती रक्ताच्या गाठी तयार झाल्याचे व गर्भ खराब झाला, गर्भ काढावा लागेल असे सांगितले. गर्भ खराब झाल्यामुळे आम्ही सहमती दिली.
गर्भ काढल्यानंतर तिच्या पोटात भयंकर वेदना होऊ लागल्या. रक्तस्राव खूप होत होता. परंतु डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. त्यांनी इलाज करण्यास हलगर्जीपणा केला. आम्ही वारंवार सांगून ऐकले नाही व त्यांच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या दिवशी २६ मे रोजी पुन्हा सोनोग्राफी केली. तो रिपोर्ट साधारण आहे, असे सांगून घरी जाण्यास सांगितले. परंतु तिला त्रास कमी झाला नाही.
आम्ही दुसऱ्या डॉक्टरांचे उपचार चालू केला. त्यांनी तपासणीत पोटात सेप्टिक झाले आहे, शस्त्रक्रिया करावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार २८ मे रोजी शस्त्रक्रिया झाली, परंतु पोटदुखीचा त्रास कमी झाला नाही, दोन दिवस उपचार चालू असताना ३० मे रोजी मृत्यू झाला. त्यामुळे कर्तव्यात निष्काळजीपणा, बेकायदेशिर गर्भपात केल्याने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे.