अहिल्यानगर:पावसाळ्यामध्ये डेंगू आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरात ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियान’ सुरू केले. त्याची सुरुवात आज, शनिवारी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर’ अभियानाचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी ७८ रुग्ण आढळले होते, दुसऱ्या वर्षी १८ तर यंदा जुलैअखेर ३ रुग्ण आढळले आहेत.
अभियानासाठी महापालिकेने ३० आरोग्य पथके तयार केली आहेत. प्रत्येक शनिवारी शहरातील विविध भागात, घरोघरी जाऊन सुमारे ८ हजार नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचे काम अभियान काळात केले जाणार आहे. आज श्रमिकनगर भागात या अभियानाची सुरुवात करण्यात आली. सभापती दिपाली बारस्कर, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, नगरसेवक मनोज दुल्लम तसेच नगरसेवक करण कराळे, पुष्कर कुलकर्णी, नगरसेविका रोशनी त्र्यंबके, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. धनंजय वारे डॉ. पद्मा कुलकर्णी, विद्या एकलदेवी, श्याम पंगा, रोशनी सूर्यवंशी, शशिकांत गोरे, डॉ. वृषाली आरू, सोनाली मेहत्रे, डॉ. आरती ढापसे, तसेच नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना सभापती बारस्कर यांनी डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नागरिकांना स्वच्छता पाळण्याचे आवाहन केले. मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर म्हणाले, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियान सुरू करण्यात आले. पावसाळ्यामध्ये डेंगूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये जनजागृती, पाणीसाठ्यांची तपासणी, डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण व मोफत आरोग्य तपासणी यासारख्या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
यावेळी आशा सेविका व डॉ.एन. जी. पाऊलबुधे औषधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून डेंगू विषयी जनजागृती केली. मार्कंडेय शाळेची विद्यार्थिनी समीक्षा मुद्याल हिने भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या वेशभूषेत डेंगू प्रतिबंधात्मक संदेश नागरिकांसाठी सादर केला.
डेंगू पसरवणारा एडिस इजिप्ती डास प्रामुख्याने दिवसा चावतो, त्यामुळे घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी कायम झाकून ठेवावीत, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, कुलर, फ्रीज, फुलदाण्याला-टाक्यातील पाणी दर दोन-तीन दिवसांनी बदलावे असे आवाहन वृषाली आरू यांनी केले.
