लाळ खुरकत प्रतिबंधक लसींची खरेदी नाही

राज्यातील ३ कोटी ५२ लाख पशुधनाचा प्रश्न

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्यातील ३ कोटी ५२ लाख पशुधनाचा प्रश्न

पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तालयाकडून लाळ खुरकत रोग प्रतिबंधक लसीचा (एफएमडी) अद्यापि कोणत्याही जिल्ह्य़ाला पुरवठा न झाल्याने राज्यातील सुमारे ३ कोटी ५२ लाख पशुधनाच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हिवाळ्यात या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दरवर्षी विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. राज्यस्तरावरून या लसीची अद्याप खरेदीच झाली नसल्याने पुरवठा केव्हा होणार व लसीकरण मोहीम केव्हा सुरू करता येणार याच्या विवंचनेत विभागाचे अधिकारी आहेत.

लाळ खुरकत रोगाने दरवर्षी राज्यात पशुधन दगावते. त्यामुळे पशुधन विभागामार्फत दरवर्षांतून दोनदा, दर सहा महिन्यांनी एक वेळेला, केवळ १ रुपया सेवा शुल्क आकारून लसीकरण मोहीम राबवली जाते. यंदा फेब्रुवारी, मार्चमध्ये ही मोहीम राबवली गेली, त्याची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. ऑक्टोबरमध्ये ही मोहीम पुन्हा राबवली जाणे आवश्यक होते. विशेष म्हणजे |ऑक्टोबरमध्येच साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होतो. ऊसतोडणी मजुरांबरोबरच त्यांचे पशुधनही कारखान्यांवर दाखल होत असते. या काळात पशुधन विभाग दरवेळेस कारखाना परिसरात लक्ष केंद्रित करून लसीकरणाची मोहीम राबवत असते. मात्र नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी लसीकरणाची प्रतीक्षा सुरूच आहे.

मात्र राज्य पातळीवरून अद्यापि खरेदीच झाली नसल्याने लसींचा पुरवठा झालेला नाही. त्यासाठी दोनदा निविदा मागवल्या गेल्या होत्या, मात्र खरेदी रखडलेलीच आहे. ही खरेदी का रखडली, निविदा का रद्द करण्यात आल्या, याची कुजबुज अधिकाऱ्यांमध्ये होत आहे. राज्यासाठी सुमारे ४ कोटी डोसची आवश्यकता आहे. नगर जिल्ह्य़ातील पशुधनाची संख्या सुमारे १६ लाख आहे. त्यासाठी १४ लाख डोसची आवश्यकता आहे. पशुधन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बाजारात हा डोस उपलब्ध असला तरी त्याची किंमत प्रति डोस १५ ते २० रुपये आहे. पशुधन वाचवण्यासाठी विभाग दरवर्षी ‘शून्य लाळ खुरकत पट्टा’ निर्माण करण्यासाठी ही मोहीम राबवते.

गाय, बैल, म्हैस आदी पशूंसाठी घातक असणारा हा रोग विषाणुजन्य आहे. जनावरांना ताप येणे, तोंडाला फोड येऊन जखमा होणे, खुरांना जखमा होणे अशी त्याची लक्षणे आहेत. काही खाऊच शकत नसल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन पशुधन दगावते. शेतकऱ्यांचे जीवनमानही दुग्धजन्य पशूंवर अवलंबून असल्याने लसीकरणातील दिरंगाई पशुधनाच्या जीवावर बेतणारी आहे.

पशुसंवर्धनमंत्र्यांना पत्र पाठवून लसीकरणातील दिरंगाईकडे लक्ष वेधण्यात आले आहे. लाळ खुरकत रोगप्रतिबंधक लसींचा राज्यातील कोणत्याच जिल्ह्य़ाला पुरवठा झाला नसल्याची  अधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळाली आहे. ही दिरंगाईची परिस्थिती पशुधनाच्या जीवावर बेतणारी आहे. साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच लसीकरणाची मोहीम सुरू होणे आवश्यक होते.    -शालिनीताई राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगर

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Department of animal husbandry does not buy fmd vaccine