सोलापूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात एकत्र जमणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी केल्या जाणाऱ्या विविध सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या गुरुवारी पंढरीत येत आहेत.
गतवर्षी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आषाढी यात्रेला विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यासाठी येण्यापूर्वी काही दिवस अगोदर पंढरपुरात वारकऱ्यांसाठी केलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली होती.
आषाढी यात्रेपूर्वी व्यवस्थेसह एकूण नियोजनाची पाहणी करणारे शिंदे हे पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते. या पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री असताना ते पुन्हा पंढरपुरात येऊन वारकऱ्यांकरिता केलेल्या सोयीसुविधांची पाहणी करण्यासाठी येत आहेत.
उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता शिंदे हे शासकीय विमानाने सोलापुरात येतील. नंतर लगेच हेलिकॉप्टरने पंढरपूरकडे रवाना होतील. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर ते वारकऱ्यांसाठी प्रशासनाने केलेल्या विविध सोयीसुविधांची प्रत्यक्ष भेटीतून पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने त्यांना वारकऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.