नेत्यांना अश्रू अनावर, बारामतीत आज अंत्यसंस्कार; राज्यात तीन दिवस दुखवटा

पुणे/मुंबई : गेली जवळपास साडेतीन दशके महाराष्ट्रातील राजकारण आणि सत्ताकारणाचा अविभाज्य घटक असलेले, धडाडीचे आणि रोखठोक राजकीय नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचा, बुधवारी सकाळी बारामती येथे विमान अपघातात झालेला मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि शोकजनक ठरला. राजकारण हे त्यांचे जीवन होते. या राजकारणाचे अभिन्न अंग असलेल्या निवडणूक प्रचारासाठी जात असतानाच त्यांच्या जीवनाची अशी अकाली, अनपेक्षित अखेर होणे मात्र दुर्दैवीच. शरद पवारांचा वारसा समर्थपणे चालवणे आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणे या दोन्ही स्वप्नपूर्तीपासून महाराष्ट्राचे हे लाडके ‘दादा’ दूर राहिले. तरी त्यांच्या जाण्याने उमटलेली पक्षातीत, सार्वत्रिक हळहळ दादांचे ‘नसणे’ अधोरेखित करणारी ठरली. ( १९५९ – २०२६)

बारामती : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी सकाळी बारामती तालुक्यात येत असताना विमान कोसळून झालेल्या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या निधनाने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून राज्य सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. २९) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील.  गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशभरातील राजकीय पक्षांचे नेते या प्रसंगी  उपस्थित राहणार आहेत.

बारामती तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा या गावात बुधवारी सकाळी अजितदादांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अजित पवार यांच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले. मात्र, सकाळी पावणेनऊच्या सुमारास हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी आधीच कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.  या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) दिली.

अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने देशभर खळबळ उडवली. प्रशासनावर पकड असलेला, जनतेच्या प्रश्नांवर सदैव काम करत राहणारा आणि रोखठोक व्यक्तिमत्त्व असलेला नेता अकाली काळाच्या पडद्याआड गेल्याच्या धक्क्याने सारेच हादरले. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशभरातील नेतेमंडळींनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमधून तर बुधवारी आकाश कोसळल्याची भावना व्यक्त होत होती. पक्षाच्या नेत्यांना अश्रू अनावर होत होते तर राज्यभरातील कार्यकर्त्यांनी शोकमग्न अवस्थेत बारामतीकडे धाव घेतली.

 अजित पवार यांचे पार्थिव ठेवण्यात आलेल्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यदर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी गर्दी केली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्या प्रतिष्ठानच्या मुख्य इमारतीत ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन सांत्वन केले.  राज्यात २८ ते ३० जानेवारी दरम्यान दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठान  मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची सखोल जाण होती. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मनगटावरील घड्याळामुळे ओळख

पुणे : अजित पवार यांची ओळख त्यांच्या मनगटी घड्याळावरून पटली, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. अपघातानंतर आगीने पूर्णपणे वेढलेल्या लिअरजेट विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरलेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मदतीसाठी घटनास्थळी धाव घेणार्‍या ग्रामस्थांच्या मते, मनगटी घड्याळामुळेच अजित पवार यांची ओळख पटली. समाजमाध्यमावर एक चित्रफीत समोर आली असून, त्यात एक व्यक्ती भाजलेल्या मृतदेहाच्या मनगटावरील घड्याळ दाखवत, संबंधित मृतदेह अजित पवार यांचा असल्याचा दावा करताना दिसतो. या दुर्घटनेत इतर मृतांमध्ये वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, सहवैमानिक कॅप्टन शांभवी पाठक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव आणि विमानसेविका पिंकी माली यांचा समावेश आहे.

* सकाळी ८.१० वाजता मुंबईहून विमानाचे उड्डाण. ८.४३ वाजता बारामतीत उतरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर रनवे ११ वर उतरण्याची परवानगी. पायलटचा प्रतिसाद नाही. क्षणात ८.४४ वाजता रनवेजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्याची माहिती डीजीसीएने दिली.

* फ्लाइट-ट्रॅकिंग डेटानुसार, अपघात होण्यापूर्वी हे विमान सुमारे ३५ मिनिटे हवेत होते.

* पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी तालुक्यातील निरावागज, पणदरे, करंजेपूल (सोमेश्वर) आणि सुपा येथे प्रचारसभा घेणार होते.

* एएआयबीचे पथक आणि महाराष्ट्र फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीचे अधिकार्‍यांनी घटनास्थळी नमुने गोळा करून तपास सुरू केला.

* अपघातानंतर काही तासांतच, बॉम्बार्डियर लिअरजेट-४५ हे विमान चालवणार्‍या व्हीएसआर व्हेंचर्सचे संचालक व्ही. के. सिंग यांनी उतरताना दृश्यमानतेची अडचण असल्याचे संकेत मिळाल्याचे सांगितले.

* भारतीय हवाई दलाने लोहगाव तळावरून हवाई वाहतूक नियंत्रण कर्मचार्‍यांचे एक पथक, तांत्रिक उपकरणे बारामती विमानतळावर पाठवली.

* आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचल्या, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

* पाचही मृतदेह बारामतीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले की, तीव्र भाजल्यामुळे आणि गंभीर जखमांमुळे मृतदेह तत्काळ ओळखता येण्याजोगे नव्हते.

* २,२५० किलोपेक्षा अधिक वजनाची विमाने किंवा टर्बोजेट विमाने यांच्याशी संबंधित अपघात व गंभीर घटनांचा तपास करण्याचा अधिकार असलेल्या एएआयबीकडे अपघाताचा तपास सोपवण्यात आला.

* बारामती विमानतळावर इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम (आयएलएस) उपलब्ध नाही. ही प्रणाली अचूक रेडिओ नेव्हिगेशनद्वारे रात्री, खराब हवामानात किंवा कमी दृश्यमानतेत धावपट्टीकडे विमानाला मार्गदर्शन करते.

अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झाले आहे, ते भरून निघणारे नाही. या अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकात्यावरून मांडली गेली, असे कळले. पण यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे. – शरद पवार, ज्येष्ठ नेते