राज्याचे मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. त्यांच्यासोबतच्या नेत्यांनीही अजित पवार हे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते आहेत, असे विधान अनेकवेळा केलेले आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर मुख्यमंत्रिपदासाठी चांगलेच आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात. याच मुख्यमंत्रिपदावर आता खुद्द अजित पवार यांनी भाष्य केले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
“दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूक येईल, त्यासाठी…”
पुण्यात राष्ट्रवादी पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांनी पूर्ण क्षमतेने काम केले पाहिजे, असा सल्ला दिला. “दोन महिन्यांनी लोकसभा निवडणूक येईल. महिन्याभरात आचारसंहिता लागेल. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आले पाहिते. त्यासाठी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता कमी पडता कामा नये. गटातटाचं राजकारण अजिबात करून नका. काम करताना शंभर टक्के आपल्या मनासारखं काम होत नाही. आपण लोकशाहीमध्ये काम करतो. अनेकांचे विचार काय, हे समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर बहुमताचा आदर करून निर्णय घ्यायचा असतो,” असे अजित पवार म्हणाले.
“जातीपातीचं, नात्यांचं राजकारण नको”
“कधीकधी माझं पोस्टर लागलं पाहिजे, माझा बोर्ड लागला पाहिजे, असा आग्रह केला जातो. पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की, जिल्हाअध्यक्ष, महत्त्वाचे पदाधिकारी यांनी खालच्या कार्यकर्त्यांकडून अशी अपेक्षा करू नये. आपण याआधी अनेकांना संधी दिली. निवड करताना जातीपातीचं, नात्यांचं राजकारण अजिबात करता कामा नये. निवड करताना सर्व समाज, घटक दिसला पाहिजे. पदाधिकाऱ्यांमध्ये भटके, अल्पसंख्याक असे सगळेच दिसले पाहिजेत,” असा सल्ला अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला.
“… तेव्हा कुठे आम्ही इथपर्यंत पोहोचलो”
“आम्ही आमच्या उमेदीच्या दिवसांत नव्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. नवी आव्हानं पेलली. तेव्हा कुठे आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहेत. १९९९ ते २००४ सालात आम्ही खूप काम केलं होतं. आम्ही लोकांमध्ये खूप फिरलो. त्यामुळे २००४ साली राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला होता,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच “२००४ साली आम्ही मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही, याच्या खोलात मी जात नाही. कारण तेव्हा छगन भुजबळ, आर आर पाटील हे तेथे होते. पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
“बाबांनो जरा कळ सोसा”
राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बोलताना कार्यकर्त्यांनी थोडा धीर धरावा, असा सल्ला त्यांनी दिला. “बाबांनो जरा कळ सोसा. धीर धरा. तुम्ही सारखे मुख्यमंत्रिपद, मुख्यमंत्रिपद म्हणता. असे करू नका. सर्वप्रथम आपली संघटना मजबूत करू. लोकांपर्यंत संघटना पोहोचवू. लोक आपल्याकडे येत आहेत. लोकांचा आपल्यावर विश्वास वाढत आहे,” असे अजित पवार म्हणाले.