“…ही तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची सूचना”, अजित पवारांनी पुण्यात बोलताना दिला इशारा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील करोनाविषयक आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना तिसऱ्या लाटेविषयी चिंता व्यक्त केली आहे.

Ajit-Pawar3-1
उपमुख्यमंत्री अजित पवार (संग्रहीत छायाचित्र)

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पुणे जिल्हा आणि पुणे शहर या भागातील करोनाच्या परिस्थितीविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पुण्यातील करोनाच्या परिस्थितीवर आणि जागतिक स्तरावर करोनाच्या वाढणाऱ्या रुग्णांविषयी चिंता व्यक्त केली. तसेच, पुण्यात या सर्व परिस्थितीशी लढण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. यावेळी, जागतिक स्तरावरील करोनाबाबत बोलताना अजित पवार यांनी तिसऱ्या लाटेचा धोक्याचा इशारा देखील दिला आहे.

तिसऱ्या लाटेसाठी काळजी घेत आहोत…

यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. “पुणे जिल्ह्यात ७० लाख नागरिकांना लसीकरण करण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर सध्या ५ ते ६ लाखांच्या दरम्यान रोजचे करोनाबाधित आढळत आहेत. ही तिसऱ्या लाटेबाबत धोक्याची सूचना आहे. त्यामुळे आम्ही काळजी घेत आहोत”, असं अजित पवार म्हणाले आहेत.

पुण्यात तिसऱ्या लाटेसाठी पूर्वतयारी सुरू

“पुण्यात गेल्या ४ आठवड्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी काम चालू आहे. प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी ऑक्सिजन प्लांट असावा असं नियोजन केलं आहे. काही प्लांटचं काम सध्या सुरू देखील आहे. सध्या देशात सर्वात जास्त रुग्णसंख्या केरळमध्ये पाहायला मिळते आहे. आत्ता आपल्या भागात ८९८ कोविड लसीकरण केंद्र आणि खासगी ४०० केंद्र आहेत”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

दुसऱ्या डोसला प्राधान्य

दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुणेकरांना लसीकरण करताना पहिल्या डोसपेक्षा दुसऱ्या डोसला प्राधान्य दिलं जाईल, असं नमूद केलं आहे. “पुणे जिल्हा आणि शहरमध्ये पहिला डोस देण्याऐवजी ज्यांचा पहिला डोस झालाय, त्यांना दुसरा डोस देऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करायचं धोरण आपण ठेवलं आहे. त्यानंतर राहिलेल्या लोकांना पहिला डोस द्यायचा. बिलं कमी करण्याविषयी देखील आपण कारवाई करतो आहोत”, असं ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Deputy cm ajit pawar speaks on corona third wave patients increase in pune oxygen plants pmw

ताज्या बातम्या