राज्यात महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तर तितक्याच अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेचा मोठा गट भाजपाच्या बाजूने उभा राहिल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार पडलं. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अस्तित्वात आलेल्या नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या असताना अजूनही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच ठरले असल्यामुळे नेमका मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. यासंदर्भात नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे गटात एकूण ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदार भाजपासोबत सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे भाजपामधील इच्छुक नेतेमंडळी आणि शिंदे गटातील शिवसेना आमदार यांच्यापैकी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? यासंदर्भात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. स्वपक्षीयांना नाराज न करता शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदे देण्याचं आव्हान भाजपासमोर असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळेच सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार लांबवला जात असल्याचं बोललं जात आहे.

कधी होणार मंत्रिमंडळ विस्तार?

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यावर फडणवीसांनी माहिती दिली. “आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करू. या सगळ्यात आम्हाला त्यासंदर्भातली बैठक घ्यायला वेळ मिळाला नाही. कालच आमची बहुमत चाचणी झाली आहे. एकनाथ शिंदेही ठाण्याला गेले नव्हते आणि मीही नागपूरला आलो नव्हतो. ज्यांनी आपल्याला निवडून दिलंय, त्यांचे आभार मानल्याशिवाय काम सुरू करायचं कस? उद्या-परवा आम्ही बसून सगळं ठरवू. फॉर्म्युला ठरवू आणि तुम्हाला सांगू”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

फडणवीस यांच्या आधीच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला पाच कँबिनेट आणि सात राज्यमंत्रीपदे देण्यात आली होती. आता मात्र पूर्वीपेक्षा अधिक मंत्रीपदे व काही महत्वाची खाती शिंदे गटाला दिली जातील, मात्र मंत्रिमंडळावर भाजपचा वरचष्मा राहील, असं बोललं जात आहे. पुढील दोन-अडीच वर्षांत सरकारला चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान असल्याने भाजपच्या अनुभवी मंत्र्यांचाही समावेश मंत्रिमंडळात केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm devendra fadnavis maharashtra cabinet expansion cm eknath shinde pmw
First published on: 05-07-2022 at 18:19 IST