मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सातत्याने सरकारला लक्ष्य केलं जात आहे. सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते खातेवाटपापर्यंत अनेक मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला खोचक शब्दांत टोला दिला आहे. तसेच, “अडीच वर्षं ज्यांनी काही केलं नाही, ते आम्हाला शहाणपण शिकवत आहेत”, अशा शब्दांत त्यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर तोंडसुख घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सरकार कसं चालतं ते आम्ही…”

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चिमूरमध्ये शहीद स्मृतिदिन आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी शहीदांना श्रद्धांजली वाहतानाच विरोधकांवर देखील टीका केली. “गेल्या अडीच वर्षात राज्यात सरकार नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती. अडीच वर्ष ज्यांनी काहीही केलं नाही, ते आज आम्हाला शहाणपण शिकवत आहेत. माझं त्यांना एवढंच सांगणं आहे की ५ वर्षं आमचं सरकार होतं. सरकार कसं चालतं, हे आम्ही दाखवून दिलं. आजही लोक लक्षात ठेवतात की २०१४ ते २०१९ मध्ये जनतेचं सरकार होतं. आता पुन्हा एकदा आम्ही सत्तेत आलो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा लोकाभिमुख सरकार आम्ही आणू”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“हे लबाडच निघाले”

“गेल्या अडीच वर्षांत ७०० रुपये बोनस देतो असं सांगून एक नवा पैसा धानाच्या शेतकऱ्याला मिळाला नाही. आपण त्याच वेळी सांगितलं होतं की लबाडाचं आवतण जेवल्याशिवाय खरं नाही. हे लबाडच निघाले. पण आजच मुख्यमंत्र्यांसोबत मी बोनस देण्यासंदर्भात चर्चा करेन. आपलं सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल”, असं फडणवीस म्हणाले.

“संजय गांधी निराधार योजनेचे पैसे गरीब विधवांना सहा-सहा महिने मिळाले नाहीत. प्रत्येक सामान्य माणसाला त्रास देण्याचं काम झालं. पण आता चिंता करण्याचं कारण नाही. लवकरच सगळ्या गोष्टी आपण मार्गी लावू”, असंदेखील फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy cm devendra fadnavis mocks uddhav thackeray government pmw
First published on: 16-08-2022 at 13:44 IST