Eknath Shinde Virat Kohli Meeting: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या लंडनमध्ये आहेत. ब्रिटिश संसदेतील दोन स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये त्यांना तीन पुरस्कार देण्यात आले. ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये ‘कॉमनवेल्थ पब्लिक लीडरशिप रिकग्निशन’, तर ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये ‘स्टेटसमनशिप अवॉर्ड’ने त्यांना गौरविण्यात आले. याशिवाय लंडनमधील महाराष्ट्र मंडळातर्फे त्यांना ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ हा सन्मान दिला गेला. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीही लंडनमध्ये वास्तव्यास आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराट कोहलीची भेट घेतली.
या भेटीनंतर एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधत असताना एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यात काय संवाद झाला, याची माहिती दिली. ते म्हणाले, “मी लंडनमध्ये आलो असल्याचे विराट कोहलीला कळल्यानंतर तो मला भेटण्यासाठी आला. भारताचा एवढा मोठा क्रिकेटपटूबरोबर भेटता आले, याचा मला आनंद वाटला. विराट खूप नम्र आहे. आम्ही यापूर्वीही अनेकदा भेटलो होतो. पण आजची भेट विशेष होती. आमच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मला जे पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल चर्चा झाली. याशिवाय महाराष्ट्रात आम्ही जी विकासकामे करत आहोत. त्याचीही माहिती दिली. विराट कोहलीनेही महाराष्ट्राच्या विकासाबद्दल बोलताना म्हटले की, यापूर्वी असा विकास पाहिला नव्हता. आम्ही पुढे काय काय करणार आहोत, याची माहिती दिली. आम्ही तिसरी मुंबई आता वसवत आहोत. अटल सेतू, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, शाळा आणि आरोग्याच्या बाबतीत आम्ही काय काम करत आहोत, याची चर्चा केली.”
#WATCH | London: Maharashtra Deputy CM Eknath Shinde says, "Virat Kohli lives in London, and when he learned that I am here, he met me for a goodwill visit. I was delighted that such a big Indian cricketer, the one with the most centuries, is so down-to-earth. We had met before,… https://t.co/lzNbcdWo7n pic.twitter.com/ajmA69DOiY
— ANI (@ANI) September 11, 2026
“नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ मोठे शहर उभे राहत आहेत. तिथे शिक्षण, मेडिकल, क्रीडा क्षेत्रासंबंधी अनेक पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. क्रीडाविषया संदर्भात केलेल्या कामाबाबत विराटने समाधान व्यक्त केले. शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या क्रीडा गुणांना वाव दिला पाहिजे, असे विराटने सांगितले. महाराष्ट्र जीडीपी, स्टार्टअप, इन्फ्रा आणि परदेशी गुंतवणुकीत पहिल्या क्रमाकांवर आहे, हेही सांगितले”, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
#WATCH | Star Indian Cricketer Virat Kohli met Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde in London.
— ANI (@ANI) September 11, 2026
They discussed a range of issues, including sports and infrastructure. pic.twitter.com/JAxC4cuTdy
विराट कोहली क्रीडा विषयात मदत करणार
क्रीडा क्षेत्राबाबत काही विषयांत विराट कोहली आम्हाला मदत करणार आहे, असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. “विराटकडे अनुभव आहे. तसेच युवा वर्गात त्याची लोकप्रियता आहे. स्पर्धात्मक वातावरणात नव्या पिढीने कसे पुढे जावे, त्यांना योग्य मार्गदर्शन कसे दिले जावे, याबाबत विराटने काही सूचना दिल्या आहेत. याचा महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल”, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.
