सोलापूर : जागतिक शिक्षक पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई प्रलंबित असतानाही यापूर्वी ठरल्यानुसार फुलब्राइट शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक संशोधनासाठी ते अमेरिकेस रवाना झाले. अमेरिकेत ते सहा महिने शैक्षणिक संशोधन करणार आहेत. मात्र हा विषय पुन्हा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.

लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार मिळविलेले डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील परितेवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक आहेत. त्यांना अमेरिकेतील फुलब्राइट शिष्यवृत्तीही जाहीर झाली आहे. यानुसार अमेरिकेत सुमारे सहा महिने शैक्षणिक संशोधन करण्यासाठी डिसले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मागितली होती. परंतु त्यासाठी आवश्यक कागदपत्रे न जोडल्यामुळे आणि विचारलेली कायदेशीर माहिती न दिल्यामुळे त्यांची अध्ययन रजा वादात सापडली होती. तेव्हा तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी डिसले यांची अध्ययन रजा अगोदर मंजूर करावी आणि नंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी, असे स्पष्ट आदेश देत या प्रकरणी हस्तक्षेप केला होता.

मंत्र्यांच्या आदेशानंतर प्रशासनाने डिसले यांची १५३ दिवसांची प्रदीर्घ अध्ययन रजा मंजूर केली होती, तथापि त्या वेळी डिसले यांनी जि. प. शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून आपला छळ होत असल्याची तक्रार प्रसारमाध्यमांपुढे केली होती. नंतर त्यांनी आरोप मागे घेऊन प्रशासनाकडे दिलगिरीही व्यक्त केली होती.

दरम्यान, डिसले यांनी अमेरिकेत शैक्षणिक संशोधनासाठी जाण्यासाठी मागितलेल्या प्रदीर्घ अध्ययन रजेच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. वार्की फाऊंडेशनकडून यापूर्वी मिळालेल्या जागतिक शिक्षक पुरस्कारासंबंधीची कागदपत्रेही वरिष्ठांकडे सादर केली नाहीत. यातच डिसले यांची यापूर्वी वेळापूरच्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत प्रतिनियुक्तीवर बदली झाली असता ते तेथे रुजू झाले नव्हते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण देण्याची जबाबदारी असताना डिसले यांनी जि. प. शाळांच्या विद्यार्थ्यांच्या ऐवजी परदेशातील शालेय मुलांना डिजिटल शिक्षण दिले. सलग ३४ महिने कोठेही सेवेत हजर न राहता स्वत: वेतन घेतले, ठिकठिकाणी सेवा बजावताना त्यांच्या स्वाक्षरीमध्ये फरक आढळून आला आहे, अशा विविध १२ मुद्दय़ांवर शिक्षण विभागाच्या समितीने डिसले यांची चौकशी केली होती. यात डिसले हे दोषी आढळून आल्याचा चौकशी समितीचा निष्कर्ष आहे. चौकशी समितीचा अहवाल प्रशासकीय कारवाईसाठी जिल्हा परिषद प्रशासन विभागाकडे प्रलंबित असताना गेल्या महिन्यात डिसले यांनी शिक्षकपदाचा राजीनामा प्रशासनाकडे पाठविला होता.

महाआघाडीतील मंत्र्यांच्या सलोख्यानंतर डिसले यांनी सत्ताबदलानंतर नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर इकडे जिल्हा परिषदेने सावध भूमिका घेणे पसंत केले. चौकशी अहवालानुसार डिसले यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई प्रलंबित आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी डिसले यांचा राजीनामा प्रशासकीय कारणांस्तव नामंजूर केला. यासंदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला आहे.

शैक्षणिक संशोधनासाठी..

डिसले यांच्या विरोधात सक्षम चौकशी समितीच्या अहवालात ठपका ठेवल्यामुळे त्यांच्यावरील प्रशासकीय कारवाई प्रलंबित राहिली आहे, परंतु ही चौकशी होण्यापूर्वीच मंजूर झालेल्या प्रदीर्घ अध्ययन रजेनुसार डिसले हे फुलब्राइट शिष्यवृत्तीअंतर्गत शैक्षणिक संशोधनासाठी मंगळवारी अमेरिकेकडे रवाना झाले.