“विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे आव्हान असले तरी आपला मोठ्या मताधिक्याने विजयी होईल”, असा दावा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केला.

आज (शनिवार) पालकमंत्री सतेच पाटील यांनी प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, सचिन झंवर, आदिल फरास यांच्यासमवेत इचलकरंजी येथे खासदार धैर्यशील माने, माजी खासदार काल्लाप्पांना आवाडे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या नगरसेवकांशी संपर्क साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक जिंकू असा विश्वास व्यक्त केला आहे. यावर मंत्री पाटील म्हणाले, भाजपा त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला या क्षणी ४१७ पैकी अडीचशेहून अधिक मतदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. हे संख्याबळ पुढच्या काळामध्ये आणखी वाढत राहील. निवडणूक जिंकण्याचा अडचण येणार नाही. इचलकरंजीतील ८० टक्के सदस्यांचे मतदान मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

महाविकास आघाडी एकसंघ –

माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी शिवसेनेचे आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतल्याबाबत छेडले असता निवडणूक काळात कोणी कोणालाही भेटू शकते. मंत्री यड्रावकर यांचे पाठबळ आम्हालाच मिळणार आहे. विरोधक आघाडीत एकमत नसल्याच्या अफवा पसरवत असले तरी महाविकास आघाडी एकसंघ आहे. स्थानिक राजकारणामुळे काँग्रेसचे काही सदस्य भेटले नसले, तरी ते पडद्याआडून आमच्या सोबत असल्याचे मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.