सांगली : बेदाण्याला चकाकी येण्यासाठी (वॉशिंग) चक्क डिटर्जेंट पावडरचा वापर करण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने उघडकीस आणला. याठिकाणाहून सात लाख ६३ हजाराचा बेदाणा जप्त करण्यात आला. जिल्ह्यामध्ये सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नविन बेदाणा वॉशींग व ‍रिपॅकींग सेंटर कार्यरत झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे व श्री. स्वामी यांच्या पथकाने कुपवाड एमआयडीसी सांगली येथील विजय संजय सावंत यांच्या मालकीच्या  मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन, रंजीत शिवाजी मुळीक यांच्या मालकीच्या मे. बाबा ड्राय फ्रुटस व अशोक चौगुले यांच्या मालकीच्या मे. चौगुले ट्रेडींग या तीन बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे व वॉशींग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले. मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन या पेढीमध्ये बेदाणा वॉशींग करीता डीटर्जेंट पावडर वापरली जात असल्याचे आढळल्याने सदर पेढीमधून बेदाणा व डीटर्जेंट पावडर यांचे नमुने विश्लेषणाकरीता घेवून ७ लाख ६७ हजार २१० रूपये किंमतीचा बेदाण्याचा उर्वरीत ४ हजार ५१३ कि.ग्रॅ.  साठा जप्त करण्यात आला. मे. बाबा ड्राय फ्रुटस व मे. चौगुले ट्रेडींग या पेढ्यांमध्ये रिपॅकींग केल्या जात असलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला उत्पादनाचा / रिपॅकींगचा पत्ता, रिपॅकींग व मुदतबाह्य दिनांक, न्युट्रीशनल माहिती, बॅच नंबर, परवाना क्रमांक इत्यादी नमुद नसल्याने दोन्ही सेंटरना त्यांचा व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

    तसेच कुपवाड एमआयडीसी येथील मे. सांगली ट्रेडींग व श्री दत्त कोल्ड स्टोरेज या पेढ्यांची तपासणी केली. मे. सांगली ट्रेडींग कंपनी विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच विक्री करीता साठविलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती आवश्यक मजकूर नसल्याचे आढळल्याने सदर पेढीस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. श्री दत्त कोल्ड स्टोरेज ही पेढी देखील विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे व मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा साठविल्याचे आढळल्याने कीड लागलेली पेंडखजुर या अन्न पदार्थांचे ५ कि.ग्रॅ.  चे ११० बॉक्स नष्ट करण्यात आले. या पेढीस व्यवसाय ‍ थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Detergent powder used washing currants stock worth seven and a half lakh seized ysh
First published on: 27-03-2023 at 23:07 IST