अंजनगाव सुर्जीच्या युवकाकडून निर्मिती

अमरावती :  मतदार नोंदणी कुठेही झाली असली आणि मतदानाच्या दिवशी देशातील मतदार कोणत्याही शहरात असेल तरीही बोटांचे ठसे आणि आधार लिंक्ड इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमुळे मतदानाचा हक्क बजावता येणे शक्य होईल, असे मतदान यंत्र (ईव्हीएम) अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील आनंद मिश्रीकोटकर या युवकाने तयार केले आहे. हे यंत्र पथदर्शी प्रकल्प म्हणून राज्यात वापरण्यात यावे, यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. 

अंजनगाव सुर्जी येथील मूळ रहिवासी असलेल्या आनंद मिश्रीकोटकर याने कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच २०१८ मध्ये त्याने हा प्रकल्प तयार केला.  राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांची भेट घेऊन याबाबत माहिती दिली. त्यांना हा प्रकल्प आवडला. ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ई-व्होटिंग करता येईल, असे आश्वासन सनस यांनी दिले. त्यावेळी आनंदच्या प्रकल्पाला आवश्यक ते आर्थिक सहाय्य मिळू न शकल्यामुळे प्रकल्प मागे पडला. दरम्यान, अशाच प्रकारचा प्रकल्प केंद्रीय निवडणूक आयोगाने आयआयटी मद्रासला आर्थिक सहाय्य देत तयार करण्यास सांगितले. अद्याप आयआयटी मद्रासचा प्रकल्प अंतिम झालेला नाही. त्यामुळे आजपासून तीन वर्षांपूर्वी आनंद याने तयार केलेला ई-व्होटिंगचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबवणे शक्य असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. आनंद सध्या पुणे येथे नोकरीला आहे.

ई-व्होटिंग मशीन हे एटीएमसारखे आहे. याबाबत अधिक सांगताना आनंद म्हणाला की, ‘ई-व्होटिंग मशीनचा प्रयोग संपूर्ण राज्यात करणे सहजशक्य आहे. राज्य निवडणूक आयोग स्वत:च्या अधिकारक्षेत्रांतर्गत अशाप्रकारचे यंत्र तयार करू शकते. ही यंत्रे सर्व पोलीस ठाणे, जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका कार्यालयांमध्ये लावण्यात यावीत. ज्या व्यक्तीला मतदान करायचे आहे त्याच्या बोटांचे ठसे स्कॅन होतील. ठसे स्कॅन होत नसल्यास मशीनमधील क्यूआर कोड स्कॅनरद्वारे आधार कार्डवरील क्रमांक स्कॅन होऊन मतदाराला त्याची नोंदणी असलेल्या मतदारसंघातील उमेदवाराला मतदान करता येईल.