मोहन अटाळकर

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर बदललेल्या परिस्थितीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे. राजकीय फाटाफुटीचा इतिहास असलेल्या मोर्शी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने नव्याने मोर्चेबांधणी सुरू केली असली, तरी या पक्षाला बरेच परिश्रम घ्यावे लागतील, असे चित्र आहे.  कालपरवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्या मोर्शी मतदार संघात येऊन त्यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. यातून त्यांनी अनेकांना संकेत दिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरील सत्तासंघर्ष काँग्र्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या चार कोनांमध्ये होत असताना छोटय़ा पक्षांना गृहीत धरू नका, हा संदेश राजू शेट्टी यांनी दिलाच, शिवाय संघटनेपेक्षा कुणी मोठा नाही, हा धडाही भुयार यांच्या समर्थकांना दिला.

Amit Shah on ajit pawar
भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या? अमित शाह म्हणाले, “आम्ही आमचं काम…”
different move in alliance has increased uneasiness in the Shinde Sena
मित्रपक्षाच्या ‘रसदी’मुळे शिंदे सेनेत अस्वस्थता
Proposal of friendly fight in Bhiwandi rejected by Congress seniors
भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा

स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर पक्षसंघटनेकडे लक्ष देण्याऐवजी आमदार भुयार यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक वाढवणे, पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत संपर्कात नसणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज न उठवणे असे अनेक आरोप देवेंद्र भुयार यांच्यावर होते. त्यांना पक्षातून  काढून टाकण्यासाठी हीच कारणे समोर करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांचेही राष्ट्रवादी काँग्रेससोबत चांगले संबंध आहेत, पण शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला कधी हजेरी लावली नाही. पण, गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोर्शीत आढावा बैठक घेतली, त्यावेळी देवेंद्र भुयार हे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेल्याने राजकीय चर्चा सुरू झाली होती. भुयार यांनी राजू शेट्टी यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत आपली राजकीय वाटचाल कोणत्या दिशेने असेल, हे त्यावेळी दाखवून दिले होते. महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष या नात्याने भुयार या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे सांगण्यात आले. मात्र, या महाविकास आघाडीतील काँग्रेस किंवा शिवसेनेचा कोणताही नेता जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेत सहभागी नव्हता, याकडेही लक्ष वेधण्यात आले होते.

देवेंद्र भुयार यांनी २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचा पराभव केला होता. त्यामुळे ते चर्चेत आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सध्या महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा असला, तरी त्यांनी गेल्या आठवडय़ात राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. सरकारने शेतकऱ्यांसाठी  काय केले, हा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारमध्ये थांबायचे की नाही, हे लवकरच ठरवणार असल्याचे शेट्टी यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सरकारला पाठिंबा देणाऱ्या देवेंद्र भुयार यांचे पक्षातून निलंबन देखील बरेच काही सांगून जाणारे आहे.

राजू शेट्टी यांना देवेंद्र भुयार यांना पक्षातून काढून टाकण्याचा हा टोकाचा निर्णय का घ्यावा लागला, याची चर्चा आता सुरू झाली आहे. देवेंद्र भुयार हे शेतकरी चळवळीतले आक्रमक कार्यकर्ते. पंचायत समिती सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य असा त्यांचा प्रवास झाला. सुरूवातीला ते राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेत सहभागी झाले होते. नंतर त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली. नंतर ते विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर हल्ला झाला. मतदारांची सहानुभूती मिळविण्यात आणि निवडून येण्यात ते यशस्वी झाले. मात्र, एका वर्षांतच भुयार यांच्यातील आंदोलनाची धार कमी झाल्याचे आरोप व्हायला लागले. स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करीत असताना, त्यात ते सहभागी देखील होत नव्हते, असा आक्षेप घेण्यात आला. पण, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत जवळीक वाढली, तेव्हा मात्र स्वाभिमानीत घुसफुस सुरू झाली आणि अखेर भुयार यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता भुयार यांच्यासमोर राष्ट्रवादीत प्रवेश करणे किंवा स्वतंत्र झेंडा उभारणे हे दोन पर्याय आहेत. राष्ट्रवादीसाठी हा प्रयोग मात्र अग्निपरीक्षा असेल, असे बोलले जात आहे.

मी जनतेच्या सेवेत स्वत:ला गुंतवून घेतले आहे, मला २४ तासही कमी पडतात. त्यामुळे कोण काय बोलले आणि कोणी काय निर्णय घेतला? याचे मला काही देणेघेणे नाही. राजू शेट्टी यांच्या या निर्णयाबद्दल जर अजून बोललो तर चळवळीला नख लागल्यासारखे  होईल.

—देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शी.