Devendra Fadanvis On NCP DCM Sunetra Pawar: “राष्ट्रवादी (अजित पवार) पक्ष चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी लागेल ती मदत करणार”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, “राष्ट्रवादीतील कोणालाही भाजपात प्रवेश दिला जाणार नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासह राज्यात गाजणारे अशोक खरात प्रकरण, टीसीएस प्रकरण आणि विविध राजकीय विषयांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले. एबीपी माझाच्या माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांनी हजेरी लावली होती.

खरात, टीसीएस प्रकरणावर भाष्य

माझा व्हिजन कार्यक्रमात फडणवीसांनी अशोक खरात प्रकरणावर भाष्य केले. “खरात प्रकरणाचा अतिशय व्यावसायिक पद्धतीने तपास सुरु आहे. एखाद्याचे फोटो समोर आले म्हणून तपास करण्याची मागणी योग्य नाही. त्याबाबत ठोस पुरावे येणे आवश्यक असते. पण, अशोक खरातला काही झालं तरी तुरुंगातून बाहेर येऊ देणार नाही”, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. तसेच, टीसीएस प्रकरण देखील गंभीर असल्याचे नमूद करताना यात कंपनीचा काही दोष नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीबाबत स्पष्ट केली भूमिका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, “सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीत थोडी असुरक्षितता होती. सुनेत्रा पवार कारभार चालवू शकतील का? याबाबत शंका होती. पण, मी दोन महिन्यांपासून पाहतोय त्या अतिशय दृढतेने कारभार पाहत आहेत. आणि राजकीयदृष्ट्या त्या स्थिरावतील असं दिसतंय. पक्ष चालविण्याचे कामही त्या उत्तम करतील, त्यांचीही असुरक्षितता दूर होत आहे. एक दोन महिन्यात पक्ष देखील स्थिरावेल यात काही अडचण वाटत नाही”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपात नो एन्ट्री

राष्ट्रवादीतील कोणाला भाजपात प्रवेश देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या (राष्ट्रवादी अजित पवार) पक्षातील कोणाला पक्षात घेणार नाही. पक्ष चालवण्यासाठी, पक्ष टिकवण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांना जी मदत लागेल ती आम्ही करु, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले. “२०१९ ला जे घडलं ते अतिशय अनाकलनीय होतं, त्यानंतर आता काही आश्चर्य करण्याचे कारण नाही काहीही होऊ शकतं,” असंही पुढे फडणवीस म्हणाले.

शपथविधीची शिंदेंना कल्पना दिली होती – फडणवीस

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत एकनाथ शिंदे यांना कल्पना देण्यात आली नव्हती याबाबत फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, फडणवीस यांनी शिंदेंना सर्व कल्पना देण्यात आली होती. पक्षातील देखील सर्वांना शपथविधी केव्हा होणार आहे? कोणाचा होणार आहे? याबाबत माहिती होती. त्यावेळी अनेकांनी केलेली वक्तव्य पटली नसल्याचेही फडणवीस म्हणाले.