राज्यातल्या मंत्र्यांवर रोजच नवनवे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यांच्यावर तपास यंत्रणा कारवाई करत आहेत. त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतं कोलित मिळालं आहे. महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार हे सर्वात भ्रष्ट सरकार असल्याची टीका सातत्याने सरकारवर होत आहे. तसंच विरोधक या सरकारला वसुली सरकार संबोधत निशाणाही साधत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आता सरकारवर नवा आरोप केला आहे. राज्यातल्या मंत्र्यांकडे वसुलीची सॉफ्टवेअर असल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

फडणवीस आज नागपूरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या काल दसरा मेळाव्यानिमित्त झालेल्या भाषणावरुन जोरदार टीका केली. तसंच महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोपही केले. ईडी, सीबीआय सारख्या तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दलही त्यांनी भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, “ईडी, सीबीआय का येत आहे? ती आम्ही आणलेली नाही. ती उच्च न्यायालयाने आणली आणि याचं कारण काय आहे? तर माननीय उद्धवजी, ज्या सरकारचं नेतृत्व तुम्ही करत आहात, ते महाराष्ट्राच्या इतिहासातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा की इतिहासामध्ये याची नोंद होईल. या सरकारचा एकच अजेंडा आहे तो म्हणजे खंडणी वसुली. शेतकऱ्यांना मदत करायला या सरकारजवळ पैसे नसतात. आश्वासने द्यायची आणि पाठ दाखवत केवळ कारणं सांगायची”.

हेही वाचा – “आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही, दाबणारा कधीच जन्माला येणार नाही”

राज्यातल्या आयकर विभागांच्या छाप्याबद्दल बोलताना ते म्हणाले, “आयकर विभागाने जे सांगितलं ते ऐकून राज्याचे प्रमुख म्हणून तुम्हाला झोपच यायला नाही पाहिजे की राज्यात अशा प्रकारची, एवढ्या मोठ्या प्रमाणात दलाली चाललेली आहे. दलाली या स्तरावर पोहोचली आहे की आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये असं लक्षात येत आहे की काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर तयार केलं आहे आणि त्यातून अलर्ट मिळतात की कोणाकडून किती वसुली करायची आहे. हे जर चालत असेल तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने ईडी, सीबीआय येणारच आहे. ज्याने काही केलंय त्यालाच यांचं भय असणार आहे”.