यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीला महाराष्ट्रात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी आज भाजपाकडून पदाधिकारी आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या राज्यातील पराभवाची कारणं सांगितली. तसेच त्यांनी यावेळी राजीनाम्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“या निवडणुकीत आपण फक्त तीन पक्षांशी नाही, तर ४ पक्षांशी लढत होतो. तो ४ चौथा पक्ष म्हणजे खोटा प्रचार होता. हा खोटा प्रचार आपल्या लक्षात आला नाही. त्यामुळे आपण त्याला रोखू शकलो नाही किंबहूना आपण त्याला रोखण्यासाठी तयारी करू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्रीपदी शंभूराज देसाई? राजकीय चर्चांवर उत्तर देत म्हणाले…

“संविधान बदलणार असा खोटा प्रचार”

“या निवडणुकीत भाजपा संविधान बदलणार असा खोटा प्रचार करण्यात आला. त्याचा परिणाम जेव्हा आपल्याला लक्षात आला, तेव्हा राज्यात ४ टप्प्याचे मतदान झाले होते. आपण या खोट्या प्रचाराला योग्य प्रकारे उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा परिणाम म्हणजे, पहिल्या तीन टप्प्यात भाजपाला २४ पैकी केवळ ४ जागा मिळाल्या, तर उर्वरित जागा आपल्याला पुढच्या दोन टप्प्यात मिळाल्या”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“महाराष्ट्रातील उद्योग पळवले असं खोटं सांगण्यात आलं”

“निवडणूक प्रचारादरम्यान इतर राज्यांनी महाराष्ट्रातील उद्योग पळवले, असा खोटा प्रचार करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष आकडेवारी बघितली, तर तर २०२२-२३, २३-२४ या दोन्ही वर्षात महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर राहिला. उद्धव ठाकरे यांच्या काळात गुजरात, कर्नाटक महाराष्ट्रापेक्षा पुढे होते. परंतु भाजपाच्या काळात गुजरात-कर्नाटक यांच्या पेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रात आली. महाविकास आघाडीचे नेते रोज खोटं बोलायचे, उद्योग पळवले असं सांगायचे, जर उद्योग पळाले असतील तर गुजरातच्या दुप्पट आणि गुजरात-कर्नाटकपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे कशी आली असती?” असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

“भाजपा मराठा आरक्षणाविरोधी असल्याचा खोटा प्रचार”

“मराठवाड्यात मराठा आरक्षणासंदर्भात खोटा प्रचार करण्यात आला. मराठा समाजाला भाजपाने आरक्षण दिले. महामंडळे आणि मराठा समाजासाठी अनेक योजना या आपल्या काळातच झाल्या. मात्र, ज्यांनी १९८० पासून मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्याकडे मराठा समाजाची काही मते गेली. त्यामुळे आपण मराठा विरोधी आहोत, असा खोटा प्रचार करण्यात विरोधक यशस्वी झाले”, असेही ते म्हणाले.

“उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती नाही”

“उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती असती तर मुंबई, कोकणात दिसायला हवी होती. ठाण्यापासून कोकणापर्यंत ठाकरे गटाला एकही जागा मिळाली नाही. मुंबईत ठाकरे गटाचे उमेदवार मराठी माणसांच्या मतांवर निवडून आले नाहीत. मराठी माणसांनी मत दिलं असते तर दक्षिण मुंबईत वरळीत जिथं आदित्य ठाकरे आमदार आहेत केवळ ६ हजार मते अधिक मिळाली नसती”, असंही फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा – संजय राऊत यांचा टोला, “देवेंद्र फडणवीस छोटा राजन आणि नरेंद्र मोदी…”

राजीनाम्याच्या मुद्द्यावरही केलं भाष्य

पुढे बोलताना त्यांनी राजीनामाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. “मी ज्यावेळी राजीनामा देण्याचा विचार केला तेव्हा माझ्या डोक्यात काही रणनीती होती, आजही आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. मी काल अमित शाह यांना भेटलो. त्यांचीही भूमिका तुमच्यापेक्षा फार वेगळी नव्हती. ते मला म्हणाले की, थोडे दिवस जाऊद्या. त्यानंतर आपण महाराष्ट्राबाबतची ब्ल्यू प्रिंट ठरवू” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis analysis after bjp mahayuti defeate lok sabha election 2024 spb