"तीन महिन्यात सर्वाधिक धोरणात्मक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे", विरोधकांच्या टीकेवर फडणीस म्हणाले... | Devendra Fadnavis answer allegations by opposition over cabinet decisions | Loksatta

“तीन महिन्यात सर्वाधिक धोरणात्मक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे”, विरोधकांच्या टीकेवर फडणीस म्हणाले…

“तीन महिन्यातील ५७ पैकी सर्वाधिक धोरणात्मक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे आहेत,” या विरोधकांच्या आरोपावर देवेंद्र फढणवीसांनी उत्तर दिलं.

“तीन महिन्यात सर्वाधिक धोरणात्मक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे”, विरोधकांच्या टीकेवर फडणीस म्हणाले…
देवेंद्र फडणवीस

“मागील तीन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारने ५७ धोरणात्मक निर्णय घेतले. मात्र, यापैकी सर्वाधिक निर्णय भाजपाच्या मंत्र्यांचे आहेत. मंत्रिमंडळावर फडणवीसांचं नियंत्रण आहे,” असा आरोप विरोधकांकडून होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला असता त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना घेतंय हे महत्त्वाचं नाही,” असं मत फडणवीसांनी व्यक्त केलं. ते मंगळवारी (४ ऑक्टोबर) मंत्रीमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “हे निर्णय भाजपा घेतंय, की शिवसेना घेतंय हे महत्त्वाचं नाही. हे निर्णय शासन घेतं. मंत्रिमंडळात निर्णयासाठी कोणताही विषय येतो, तेव्हा तो विषय मुख्यमंत्री ठेवत असतात आणि मग त्याला कॅबिनेट मान्यता देतं. विरोधकांना निर्णय घ्यायची सवयच नव्हती, आम्ही निर्णय घेणारे लोक आहोत.”

“ते फाईलवर बसणारे लोक”

“ते फाईलवर बसणारे लोक होते. त्यामुळे साहजिकच त्यांना त्याचं दुःख होणारच आहे. तीच मळमळ थोडी बाहेर येतेय,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

“मागास राहिलेल्या भागांना प्रधान्य दिलं जाणार”

“विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण अशा सर्वच मागास राहिलेल्या भागांना प्रधान्य दिलं जाणार आहे. हे प्राधान्य देताना इतर भागांनाही समतोल प्राधान्य मिळावं असाही आमचा प्रयत्न आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

हेही वाचा : दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना पॅकेज ते पोलिसांना घरांसाठी कर्ज, मंत्रीमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे सहा निर्णय

“पवारांनी असे सल्ले देत राहिलं पाहिजे”

शरद पवार यांनी दसरा मेळाव्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाला दिलेल्या सल्ल्यावरून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार सल्ला देत आहे हे चांगलं आहे. त्यांनी असे सल्ले देत राहिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या लोकांनाही असे सल्ले द्यावेत. थोडा अधिकचा सल्ला त्यांनी नाना पटोलेंनाही द्यावा.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 14:41 IST
Next Story
घराला आग लागल्याचा बनाव करत पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळले, तपासात धक्कादायक घटनाक्रम उघड