टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानलं पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता. १४ फेब्रवारीला सपकाळ मालेगाव दौऱ्यावर होते. मालेगावात उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. त्यावरुन प्रश्न विचारला असता सपकाळ यांनी हे उत्तर दिलं होतं. सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात या वक्तव्याचे पडसाद उमटले. भास्कर जाधव आणि विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी उत्तर दिलं. आपल्या देशात राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. आपल्या देशात ७० वर्षे खरा इतिहास शिकवला गेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

भास्कर जाधव यांनी टिपू सुलतानचा विषय मांडला. टिपू सुलतान चांगले होते की वाईट होते यावर काही आक्षेपच नाही. आक्षेप यावर आहे की टिपू सुलतान छत्रपती शिवरायांच्याइतके मोठे राजे होते असं म्हणण्याला. छत्रपती शिवरायांच्या इतकंच गुणगान टिपू सुलतानचं केलं पाहिजे त्याला आक्षेप आहे. देशाच्या इतिहासाशी जी छेडछाड करण्यात आली त्यामध्ये वर्षानुवर्षे आम्हाला हे शिकवलं की टिपू सुलतान महान राजे होते. पण हे कधीही सांगितलं नाही की ७५ हजार हिंदू आणि ३३ हजार नायरांची कत्तल करणारेही तेच टिपू सुलतान होते. हे नाही शिकवलं नाही, ते इंग्रजांशी लढले ते स्वतःचं राज्य वाचवण्यासाठी. आता खरा इतिहास जो सापडतो आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं-फडणवीस

पुढे फडणवीस म्हणाले, वर्षानुवर्षे या देशात सरकारने NCRT च्या पुस्तकात ७० वर्षे मोगल साम्राज्याच्या इतिहासाला १७ पानं दिली होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एक परिच्छेद दिला होता. आता मोदी सरकारने छत्रपती शिवरायांच्या, मराठ्यांच्या इतिहासाला NCRT मध्ये २० पानं दिली आहेत. योग्य वेळी जर नीट इतिहास शिकवला असता तर एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं. पण आपल्याला खरा इतिहास शिकवला गेलाच नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिलं. आपल्या देशात अनेक राष्ट्रभक्त मुसलमान आहेत. त्यांच्याबाबत आमचा कुठला आक्षेपच नाही. मात्र जे लोक या देशाच्या विरोधातल्या लोकांना, या देशाच्या आक्रमणकऱ्यांना आपला हिरो मानतील त्यांच्या विरोधात आम्ही लढाई करुच. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.