मुंबईसह राज्यभरात तुफान पाऊस पडतो आहे. मुंबई, पुणे, नाशिक भागांमध्ये पावसाच्या सरी जोरदार पडत आहेत. तसंच पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस पडतो आहे. नाशिकमध्ये आज ढगफुटी होण्याची शक्यता आहे. तसंच ८ जुलैपर्यंत पावसाची ही स्थिती अशीच राहणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच वर्क फ्रॉम बाबत जो प्रश्न विचारण्यात आला त्यावरही त्यांनी उत्तर दिलं

वर्क फ्रॉम होमबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

खासगी आस्थापना वर्क फ्रॉम होम देत नाहीत अशी स्थिती दिसते आहे असं विचारलं असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, “आपले कर्मचारी आहेत त्यांची जबाबदारी ही खासगी कार्यालयांनी, आस्थापनांनी स्वीकारली पाहिजे. आपल्या कर्मचाऱ्यांची त्यांच्या जिवीताची जबाबदारी ही सगळ्या आस्थापनांची आहे. हा मानवतेचा धर्म आहे. कुठलाही कायदा, जीआर, कुठलाही बडगा या सगळ्यापेक्षा मानवतेच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी आपण अलर्ट देतो तेव्हा ही अपेक्षा आहे की सगळे त्याला योग्य प्रतिसाद देतील. अत्यावश्यक सेवा सोडून बाकीच्यांना आपण सुट्ट्या दिल्या आहेत. तरीही जर कुठे कार्यालयात बोलवण्यात येत असेल तर त्यासंदर्भातली कारवाई केली जाईल. सध्याचे अलर्ट हे ८ जुलैपर्यंतचे आहेत.”असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माझं लोकांना आजही आवाहन आहे की आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि तशी आवश्यकता नसेल तर घरातच थांबा. असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईत दुपारी ३ वाजल्यापासून भरती-फडणवीस

मुंबईत दुपारी ३ वाजल्यापासून भरती असणार आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साठण्याची शक्यता आहे. तसंच अतिशय वेगवान वारे वाहतील, रविवारीही दिवसभर ४० ते ५० किमी प्रति तास असे वारे वाहात होते. साधारणपणे चार महिन्यांत जे वृक्ष पडतात त्या संख्येच्या निम्मी म्हणजेच ३५० झाडं पडली. दुपारनंतर रात्री पर्यंत वारे वाहणार आहे त्यामुळे झाडं आणखी कोसळू शकतात असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मानखुर्द मधली जी घटना आहे त्या ठिकाणी झोपडीत जे लोक राहात होते तिथले सहा लोक गेले आहेत. मात्र आपण सगळ्या भागांमध्ये अलर्ट दिले आहेत. जनतेलाही विनंती आहे की झाडं वगैरे पडू शकतात. अनपेक्षित गोष्टीही होण्याची शक्यता आहे. महिन्याभराची जी सरासरी असते तेवढा पाऊस चार दिवसांत मुंबईत पडला आहे असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच मोठ्या प्रमाणावर हानी होताना आपल्याला दिसते आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.