महाराष्ट्र काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना उद्देशून ‘गुंगी गुडिया’ असा शब्द वापरला होता. ही टीका चुकीची आहे आणि हा शब्द योग्य नाही असं म्हणत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात घुसले. तरुण नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील १०-२० कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात घुसून काँग्रेस विरोधी घोषणा देऊन सुनेत्रा पवार यांच्याबद्दल केलेल्या टीकेचा निषेध नोंदवला. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे लोक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख काँग्रेसकडून गुंगी गुडिया असा करण्यात आला. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मला वाटतं अतिशय खालच्या स्तरावर हे लोक उतरले आहेत. यांना कुठलाही प्रतिसाद मिळत नाही, कुणी विचारत नाही. चर्चेत राहण्यासाठी हे सगळं चाललं आहे. बदनाम हुए तो क्या हुआ नाम तो हुआ अशी यांची विचार करण्याची पद्धत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत इतक्या खालच्या स्तराला जाणारे आपल्याला पहिल्यांदाच पाहण्यास मिळत आहेत.”
नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहणार आहेत? असा सवाल काँग्रेस पक्षाने त्यांच्या ‘एक्स’ पोस्टमधून विचारला होता. इंदिरा गांधी यांच्याबद्दलही असाच शब्द वापरला गेला होता. मात्र त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून टीकाकारांना उत्तर दिले. सुनेत्रा पवार कधी उत्तर देणार? असा बोचरा सवाल काँग्रेसने विचारला होता. ज्यानंतर दिवसभर प्रतिक्रिया उमटत आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेसने अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलण्यास सुरुवात केली आहे असं म्हणत टीका केली.
हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं आहे?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसच्या टीकेचे समर्थन करत सुनेत्रा पवारांनी त्या दुर्गा आहेत हे सिद्ध करावं असं आव्हान दिलं आहे. दुर्गा आहे हे सिद्ध करण्यासाठी सुनेत्रा पवारांनी अर्थखातं स्वत:कडे घेण्यासह विविध कामांची यादीच हर्षवर्धन सपकाळांनी सांगितली आहे. मुंबईत गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळांनी राष्ट्रवादीने या टीकेकडे सकारात्मकपणे पाहण्याची गरज व्यक्त केली. “याबाबत गोंधळ घालण्याची अथवा शहाणपण शिकवण्याची गरज नाही. इंदिरा गांंधींना देखील गुंगी गुडिया म्हणून हिणवण्यात आले पण त्यांनी त्यांच्या कतृत्वातून त्या गुंगी गुडिया नसल्याचे सिद्ध केलं आणि वाजपेयींना देखील त्यांचे दुर्गा म्हणून कौतुक करावं लागलं. सुनेत्रा पवारांवर आम्ही गुंगी गुडिया म्हणून टीका केलीय तर, त्यांनी त्या दुर्गा आहेत असं सिद्ध करावं”, असे आव्हानच सपकाळांनी दिले.
