Devendra Fadnavis Rahul Gandhi Criticism: “राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी आहे”, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. “भारतीयांनी राहुल गांधींचे नेतृत्व नाकारले आहे, हे ते मान्य करत नाहीत. जखम कपाळाला आहे आणि पट्टी गुडघ्याला बांधत आहेत”, असेही फडणवीस म्हणाले. शरद पवारांनी लिहलेल्या पत्राबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आधीच उपाय योजना सुरु केल्याचे सांगितले. दुष्काळाची स्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया विद्यापीठाचे कॅम्पस
वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया विद्यापीठाच्या कॅम्पसचे शुक्रवारी (१८ सप्टेंबर) मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. “नव्या शिक्षण प्रणालीमुळे विदेशी विद्यापीठांना देशात कॅम्पस सुरु करण्याची परवानगी मिळाली. या अंतर्गत सात विद्यापीठं महाराष्ट्रात आली आहेत. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया विद्यापीठात जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल शिवाय परकीय चलनाची देखील बचत होईल. विद्यापीठ संशोधनाचे केंद्र बनत असल्याने अर्थव्यवस्थेला देखील त्याचा फायदा होईल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल गांधींवर टीका
राहुल गांधींनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमूल काँग्रेसचे नाव आणि चिन्हाबाबत केलेल्या टीकेवरुन देवेंद्र फडणीवसांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, “आपला पराभव लपवण्यासाठी आणि भारतीयांनी राहुल गांधींचे नेतृत्व नाकारले आहे, हे ते मान्य करत नाहीत. जखम कपाळाला आहे आणि पट्टी गुडघ्याला बांधत आहेत ही त्यांची समस्या आहे. भारतीय लोकांना काय हवंय? लोकं मोदींच्या मागे का आहेत? हे त्यांना कळेल, त्यादिवशी त्यांचं निवडणुकांमध्ये पराभव होणे थांबले किंवा त्याचा त्यांना काहीतरी फायदा होईल. राहुल गांधींची मानसिकता अराजकतावादी आहे”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
“भारतीय संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करायचे, त्या संस्थांवरील लोकांचा विश्वास उडाला पाहिजे. आणि लोकांचा विश्वास उडाला की लोकशाहीवरचा विश्वास उडाला पाहिजे, आणि लोकशाहीवरील विश्वास उडाला की संविधानावरील विश्वासही उठला पाहिजे अशा प्रकारची मांडणी राहुल गांधी करत आहेत”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शरद पवारांनी लिहलेल्या पत्राबाबत काय म्हणाले फडणवीस?
शरद पवारांनी लिहलेल्या पत्राबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “राज्य सरकारने यापूर्वीच याबाबतचे निर्णय घेतलेले आहेत. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या संदर्भात चर्चा झाली आहे. अगोदरच कर्जमाफीची योजना सुरु आहे. तीन याद्या झाल्यात, इतर याद्या करत आहोत. पात्र शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. दुष्काळाच्या उपाययोजना देखील सुरु करत आहोत. तसेच, NDRF ची मदत मिळावी यासाठी ०५ ऑक्टोबरचे पंचनामे त्यांना देणार आहोत”, असेही फडणवीस म्हणाले.
“दुष्काळाची स्थिती राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून, चारा – पाण्याची सोय करण्यात आली आहे”, असेही फडणवीसांनी सांगितले. पवारांनी लिहलेल्या पत्राचे स्वागत करतो असे म्हणत याला राजकीय रंग न देता त्यांच्याकडून अजून सूचना आल्या तर ऐकू असेही त्यांनी स्पष्ट केले.
