पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताचा संपूर्ण जगात जो गौरव झाला आणि होतोय तो अभूतपूर्व आहे. एक देशवासी म्हणून मला त्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज धाराशिव येथे केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित राज्यव्यापी संपर्क अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी ( १६ जून ) धाराशिवमध्ये जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उस्मानाबादचे धाराशिव झाल्यावर येथे पहिल्यांदाच आलो. आमचे सरकार आल्यावर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर केले, उस्मानाबादचे धाराशिव केले. आम्ही प्रस्ताव पाठविले आणि पंतप्रधान मोदींनी त्याला त्वरित मंजुरी दिली. विकास आणि विरासत अशा दोन्ही आघाड्यांवर मोदी सरकार हे उत्तम काम करते आहे.”

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांना सत्ता पाडायची माहिती होती, मुख्यमंत्री कोण होणार, हे…”, नितीन देशमुखांचा गौप्यस्फोट

“हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्त्व सोडून दिले, हे…”

“कर्नाटक सरकारने वीर सावरकर, डॉ. हेडगेवार यांना अभ्यासक्रमातून काढून टाकले. धर्मांतराला प्रोत्साहन मिळेल, असे निर्णय घेतले. वीर सावरकरांच्या अपमानावर उद्धव ठाकरेंना काय म्हणायचे आहे? हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे हिंदूत्त्व सोडून दिले, हे एकदा त्यांनी जाहीर करून टाकावे. सत्तेसाठी लाचारी पत्करणार तरी किती,” असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.

“भारताची वेगाने आर्थिक प्रगती होते आहे”

“जगात केवळ ५ देश करोनाची लस तयार करू शकले. त्यात माझा भारत देश होता, याचा मला अभिमान आहे. ही लस तयार झाली नसती, तर जगापुढे हात पसरावे लागले असते. ती लस त्यांनी आधी त्यांच्या नागरिकांसाठी वापरली असती. आज जगात अनेक देशांत मंदीचे वातावरण. पण, भारताची वेगाने आर्थिक प्रगती होते आहे. करोना काळात अर्थकारणात विविध घटकांना दिल्या गेलेल्या पॅकेजचा त्यात महत्त्वाचा हातभार आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

हेही वाचा : “धुळे आणि नंदूरबारला राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, अन् म्हणे…”, अजित पवारांची तुफान टोलेबाजी

“४५२ कोटी रुपये सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी मंजूर”

“आई भवानीच्या चरणी जी रेल्वे येणार होती, त्याला गेल्या अडीच वर्षात वर्षांत एक रुपयाही निधी महाविकास आघाडीने दिला नाही. केंद्राने अर्धे पैसे देण्यासाठी तयारी दर्शविली. पण, महाविकास आघाडीने पत्र पाठवून आम्ही पैसे देणार नाही, असे सांगितले. आता आमच्या सरकारने ४५२ कोटी रुपये सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वे मार्गासाठी मंजूर केले आहेत. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी ११,७०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. पुढच्या जूनपर्यंत तुमच्यापर्यंत पाणी पोहोचेल,” असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं.

“टेक्निकल टेक्सटाईल पार्क धाराशिवमध्ये”

“धाराशिवमध्ये मेडिकल कॉलेजची नवीन इमारत बांधणार, त्यासाठी जागाही देणार. टेक्निकल टेक्सटाईल पार्क धाराशिवमध्ये होणार,” असेही फडणवीसांनी म्हटलं.