“…म्हणून त्यांना हे प्रकरण वाढवायचं आहे”, समीर वानखेडेंवरील आरोपांवरून देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका!

समीर वानखेडे प्रकरणावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

devendra fadnavis targets mah government onn sameer wankhede case
देवेंद्र फडणवीस यांची समीर वानखेडे प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आधी आर्यन खानची अटक आणि त्यानंतर नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर केलेले आरोप या मुद्द्यांवरून मोठा वाद आणि चर्चा सुरू असल्याचं दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर आज खुद्द समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्प्टष्ट केली, तर आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या मुद्द्यावरून आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

नवाब मलिक सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आणि २ ऑक्टोबरला कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकण्याच्या एनसीबीच्या कारवाईवर गंभीर आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. “नवाब मलिक यांचं दु:ख वेगळं आहे. पण अशा प्रकारे तपास अधिकाऱ्याला टार्गेट करणं योग्य नाही. ते संवैधानिक पदावर आहेत. रोज आरोप लावायचे, आपल्या सरकारवर दबाव टाकून साक्षीदारांना वादाच्या भोवऱ्यात टाकायचं. हे अयोग्य आहे. साक्षीदारांची विश्वासार्हता न्यायायलयाबाहेर समाप्त करण्याचा प्रयत्न झाला, तर कुठलीच केस टिकणार नाही”, असं ते म्हणाले.

जात-धर्म काढणं दुर्दैवी

समीर वानखेडेंच्या धर्माविषयी नवाब मलिक यांनी आक्षेप घेतल्यानंतर त्या मुद्द्यावरून देखील फडणवीसांन आक्षेप घेतला आहे. “एखादा तपास अधिकारी कारवाई करतो म्हणून त्याची जात-धर्म काढायचा हे दुर्दैवी आहे. शेवटी वानखेडेंच्या पत्नीला खुलासा करावा लागला. वानखेडे चुकले असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे हे मान्य आहे. पण हेतुपुरस्सर अधिकाऱ्याला टार्गेट करणं मान्य नाही. या प्रकरणात आरोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे एनसीबीच्या वरिष्ठांशी त्याची चौकशी करायला हवी”, असं फडणवीस म्हणाले.

त्यांना आहे तिथेच ठेवा, इथे आले तर…”, देवेंद्र फडणवीसांनी साधला शिवसेनेवर निशाणा!

म्हणून राज्य सरकार हा वाद वाढवतंय?

दरम्यान, आर्यन खान, समीर वानखेडे यांच्याबाबत राज्य सरकार विशिष्ट कारणासाठी वाद वाढवत असल्याचा दावा फडणवीसांनी केला. “त्यांची राज्यात इतकी प्रकरणं सुरू आहेत आणि इतक्या प्रकरणांमध्ये ते फसले आहेत, की त्यावरून त्यांना राज्याचं लक्ष हटवायचं आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार हा वाद वाढवतंय”, असा आरोप फडणवीसांनी केला.

समीर वानखेडेंविरोधात मुंबईत तक्रार दाखल; शाहरुख खानकडे खंडणी मागितल्याचा आरोप

१ हजार कोटींच्या दलालीचं काय झालं?

“राज्यात १ हजार कोटींच्या दलालीवर तोंडं बंद का आहेत? १९० कोटींची कमाई सापडली त्यावर तोंडं बंद का आहेत? सॉफ्टवेअरनं वसुली सुरू आहेत, त्यावर तोंडं बंद का आहेत? कोर्टाच्या आदेशाने सीबीआयने तपास केल्यानंतर गृहमंत्री फरार आहेत. त्यावर तोंडं बंद का आहेत?” असा सवाल देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपस्थित केला. संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का? नवाब मलिक बोलले का? यांना हे माहिती आहे की त्यावर बोललं की हे फसतील. पण कितीही प्रयत्न केला, तरी हा प्रश्न येईलच की दलालीचं काय झालं? असं देखील ते म्हणाले.

जे छापे पडलेत, त्यातून जी माहिती बाहेर यायला लागलीये, यातून हे खरंच महावसुली सरकार आहे असा संदेश लोकांमध्ये जातोय. लोकांचा त्यावर पूर्ण विश्वास बसू लागलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Devendra fadnavis bjp targets mahavikas aghadi on sameer wankhede case pmw