केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाची बातमी समोर आली आणि त्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानीपणे निर्णय घेतल्याची बातमी द इंडियन एक्सप्रेसने दिली. त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. या घडामोडीनंतर अखेर निवडणूक आयोगाच्या तिन्ही आयुक्तांनी संयुक्त निवेदन जारी करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय निवडणूक आयोगातील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली होती. आता या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘व्होट चोरी नाही, तर यांचा मेंदूच चोरीला गेला आहे’, अशी खोचक टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

“राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा फेक नरेटीव्ह फेल झालेला आहे. संविधान हातामध्ये घेऊन राहुल गांधी दररोज संवैधानिक संस्थांवर वेगवेगळे आरोप करायचे. ते संवैधानिक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम करत आहेत. लोकांचा त्यावरचा विश्वास उडवायचा यासाठी ते प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी संविधान दाखवत असले तरी त्यांना या संविधानाने दिलेली लोकशाही मान्य नाहीये”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

“राहुल गांधींना अतिडावी राजवट आणायची आहे’ : फडणवीस

“माझं तर असं स्पष्ट मत आहे की राहुल गांधी यांना संवैधानिक संस्थांवर प्रश्न उपस्थित करून हळूहळू भारतीय संविधानावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत. कारण आता राहुल गांधी यांची मानसिकता कम्युनिस्ट, साम्यवादी आणि अतिडावी झालेली आहे”, अशी टीका फडणवीस यांनी केली.

“राहुल गांधी यांना भारतात अतिडावी राजवट आणायची आहे. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमधील त्यांच्या शेवटच्या भाषणात एक शंका व्यक्त केली होती. ज्या प्रकारची अराजकता तयार केली जाऊ शकते हे त्यांनी सांगितलं होतं ते आज राहुल गांधी करताना स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे या संविधानावरील लोकांचा विश्वास उठला पाहिजे असा प्रयत्न राहुल गांधी करत आहेत”, अशी टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.

‘व्होट चोरी नाही, यांचा मेंदू चोरीला गेला’

“विरोधक व्होट चोरी झाली असं म्हणत आहेत. मात्र, यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे. मी आता पंतप्रधान मोदी यांना विनंती करणार आहे की एखादी अशी चौकशी समिती तयार करता येईल का? जी विरोधकांना त्यांचा मेंदू परत आणून देईल. जो यांचा मेंदू चोरीला गेलेला आहे किंवा त्यांनी तो गहाण ठेवलेला आहे. तो त्यांचा मेंदू त्यांना परत मिळेल अशी काही व्यवस्था करता येईल का अशी माझी मागणी आहे”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.