Devendra Fadnavis responds to PM Modi’s fuel saving appeal with a Bullet ride: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात चक्क बुलेटवर एंट्री केल्यानंतर त्यावर जोरदार चर्चा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण हा मार्ग निवडल्याचं त्यांनी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर नमूद केलं आहे. सोबत आपल्या बाईक वारीचे फोटोदेखील त्यांनी शेअर केले आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींचं आवाहन व देवेंद्र फडणवीसांची बुलेट वारी चर्चेत आली असतानाच त्यांनी आपल्या या भूमिकेमागचं कारण स्पष्ट केलं आहे. तसेच, राज्य सरकार पुढचे ६ महिने कोणताही मोठा कार्यक्रम करणार नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बुलेट वारीनंतर जाहीर केलं आहे.

बुलेटवर देवेंद्र फडणवीस, डबलसीट आशीष शेलार!

आज विधानभवनात नव्याने निवडून आलेल्या विधानपरिषद सदस्यांचा शपथविधी पार पडला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवर विधानभवनात दाखल झाले. त्यांच्यामागे डबलसीट आशीष शेलार बसले होते. त्यांच्यासोबतचे कर्मचारी व इतर सुरक्षारक्षकदेखील बुलेटवरच विधानभवनात दाखल झाले. त्यांच्या या कृतीची थोड्याच वेळात सर्वत्र चर्चा होऊ लागली. शेवटी फडणवीसांनी नंतर माध्यमांशी बोलताना आपल्या या कृतीमागचं कारण स्पष्ट केलं.

…म्हणून मी बुलेटवर विधानभवनात आलो – देवेंद्र फडणवीस

“पंतप्रधानांनी जे काही निर्देश दिलेत, ते देशहितासाठी आहेत. त्यामुळे आपापल्या परीनं जे काही करता येईल, ते करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्रातिनिधिकपणे त्या आवाहनाचा प्रचार व्हायला हवा यासाठी आम्ही हे करतोय. राज्यातील नेतेमंडळी जेव्हा अशा प्रकारे प्रचार करतात, तेव्हा ते लोकांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे मी आज इथे बाईकवर आलो आहे. आम्ही सगळ्यांचे ताफे कमी केले आहेत. विदेशवाऱ्या रद्द केल्या आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

devendra-fadnavis-bullet-ride-vidhan-bhavan-ashish-shelar
देवेंद्र फडणवीसांची बुलेट वारी! (फोटो – X/Devendra Fadnavis)

पुढचे ६ महिने मोठे सरकारी कार्यक्रम नाही, फडणवीसांची घोषणा

दरम्यान, खर्चकपात व इंधनकपातीचं मोदींनी केलेलं आवाहन राज्यात अंमलात आणताना पुढचे ६ महिने सरकार कोणताही मोठा कार्यक्रम करणार नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी जाहीर केलं. “वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन कसं वाचवता येईल हाही आमचा प्रयत्न असेल. उद्या आम्ही साताऱ्याला एका मोठ्या सरकारी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे. त्याचं सगळं नियोजन झालं असून त्यावर आधीच पैसेही खर्च झाले आहेत. पण यानंतर आम्ही पुढचे ६ महिने सरकारच्या वतीने कोणतेही मोठे कार्यक्रम करणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.

“उद्या साताऱ्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळपास २५ लाख कुटुंबांना १० हजार कोटी रुपये केंद्राच्या वतीने देण्यात येणार आहेत. त्यासाठी हे आयोजन करण्यात आलं होतं. त्याचं नियोजन फार आधीपासून आम्ही करून ठेवल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही रद्द केलेला नाही. पण यापुढे सगळ्यांना निर्देश दिले आहेत की मोठे शासकीय कार्यक्रम यापुढे घ्यायचे नाहीत”, अशी माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान मोदींवर विरोधकांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

इंधनकपातीचा सल्ला देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांना देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगातले सगळे देश ज्यावेळी यापेक्षा कठोर निर्णय घेत आहेत, तेव्हा आपल्याला पंतप्रधानांनी थोडासा त्याग करायला सांगितला आहे. कोणतेही कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्यावर इतका गदारोळ करणं योग्य नाही. यापूर्वी इंदिरा गांधी असतानाही हे झालं आहे. नरसिंहराव यांचं सरकार असतानाही अशाच उपाययोजना करण्यात आल्या होत्या. चिदम्बरम अर्थमंत्री असतानादेखील २०१२ साली अशा प्रकारची पावलं उचलण्यात आली होती. त्यामुळे असं दुटप्पी वागणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.

सोशल मीडियावरील आक्षेपांवर फडणवीस भडकले

दरम्यान, फडणवीसांना यावेळी माध्यम प्रतिनिधींनी सोशल मीडियावर खुद्द पंतप्रधान विदेश दोऱ्यावर जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याबाबत विचारणा केली. तेव्हा फडणवीसांनी अशा लोकांना ‘बिनडोक’ म्हटलं. “देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं यापेक्षा जास्त मूर्खपणाचं दुसरं लक्षणच असू शकत नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, धोरणात्मक करार होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. त्यामुळेच पंतप्रधानांनी सांगताना अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे विदेश प्रवास न करण्याचं आवाहन केलं आहे. याचा अर्थ असा नाही की कुणी मोठा व्यापारी विदेशात एखादा करार करत असेल तर त्यानं तो करार रद्द करावा असा याचा अर्थ नाही. त्यामुळे जे पंतप्रधानांवर अशी टीका करत आहेत, ते बिनडोक आहेत”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा संताप व्यक्त केला.