कर्जत : राज्य सरकारची मराठा समाजाला न्याय देण्याचीच भूमिका आहे. त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांना आश्वासने दिली आहेत. पाठीमागे कोणतीही आश्वासने दिलेली नाहीत. जी काही आश्वासने दिली आहेत, ती त्यांनी स्वतः वाचून दाखवली आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौंडी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस चौंडी येथे आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मात्र मुख्यमंत्री अभिवादन करून सभेला न थांबता लगेच हेलिकॉप्टरने दिल्लीला निघून गेले.
मध्यरात्री मराठा आरक्षण मागणी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. त्यांना कोणते आश्वासन दिले, अशी विचारणा केली असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जरांगे यांना जी आश्वासने दिली ती तुमच्यासमोर आहेत. मागे काही नाही. त्यांनी स्वतः तसेच मंत्री राधाकृष्ण विखे, आमदार प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवली आहेत. मराठी समाजाला न्याय देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे. त्यानुसार कार्यवाही केली जात आहे.
जयंती महोत्सवाचे ऑडिट करण्याची मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार यांना टोला लगावला. ते म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले, कशाचे ऑडिट केले पाहिजे याचे भान ठेवले पाहिजे. इतक्या महत्त्वाच्या पर्वाला अशा पद्धतीने राजकीय रूप देणे योग्य नाही. राजकारण कोठे करावे, कोठे नाही याचे भान ठेवावे, असा मी त्यांना सल्ला देतो.
देशाची हिंदू अस्मिता जागृत ठेवण्याचे, परकीय आक्रमणाच्या विरोधात सनातन धर्म जिवंत ठेवण्याचे काम अहिल्यादेवींनी केले. लोकशासन, प्रशासनाचा आदर्श त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनंतर केला, असे मुख्यमंत्री अभिवादन करताना म्हणाले.
