मुंबई : गुन्हा घडला त्या क्षेत्रात पिडीत पोचणे अशक्य असेल त्यावेळी इतर पाेलीस ठाण्यात शून्य – प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंद करता येतो. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी तशी अजितबात स्थिती नाही. तरीसुद्धा या अपघाताचा महाराष्ट्राची मानहानी करण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने शून्य गुन्हा नोंदवला. हा एफआयआर नोंदवण्याचा कर्नाटकला राज्याला अधिकार नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केला.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत -जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना अजित पवार यांच्या विमान अपघाता संदर्भात मागणी करुनसुद्धा महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही. त्यामुळे बंगळुरुमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद करावा लागला, असे सांगितले होते.
त्यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय न्याय संहितेमध्ये शून्य गुन्हा नोंद करण्याबाबत स्पष्टता आहे. जेव्हा अपघात होतो, तेव्हा एडीआर (अपघाती मृत्यु नोंद) केली जाते. हा एक प्रकारचा एफआयआर आहे. एडीआर नोंद केल्यावर अपघाताची चौकशी केली जाते, त्यामध्ये संशय आल्यास एफआयआर नोंद होतो. समजा पोलीस एफआयआर नोंद करत नसतील तर न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.
एफआयआर की एडीआर यापेक्षा आरोपपत्रामध्ये पोलीस कुणावर ठपका ठेवतात हे महत्वाचे असते. रोहीत पवार हे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांना दिल्लीत भेटले. गांधींनी कर्नाटकातील त्यांच्या सरकारला गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले, त्यरु मध्ये गुन्हा नोंद झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताची विमान अपघात तपास संस्था (एएआयबी) चौकशी करत आहे. ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यात काही वावगे आढळल्यास एफआयआर नोंदवला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांच्या अपघाताने सर्व व्यथीत आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातामध्ये कोणाचा बाप असला तरी शोधून काढण्यात येईल. यात कट असेल अशी शक्यता नाही, पण असेल तर त्याचा मुडदासुद्धा खणून काढला जाईल. केंद्रीय तपास संस्थेकडून विमान अपघातची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. एएआयबी अहवालाची वाट पाहत आहोत. हा अहवाल आल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गुन्हा नोंदवेल, असे फडणवीस म्हणाले.
संशयाला जागा नाही : मुख्यमंत्री फडणवीस
विमान धावपट्टीवर उतरण्यासाठी ५ हजार मीटरची दृश्यमानता हवी, पण अपघाताच्या त्या दिवशी ३००० मीटर होती. वैमानिक व सहवैमानिक यांच्या मद्यचाचण्या नकारात्मक आहेत. त्यांच्या व्हिसेरामध्ये विषाचा अंश नाही. नियुक्त वैमानिक आजारी पडल्याने बदली वैमानिक रात्री निश्चित करण्यात आला होता.
शवविच्छेदन अहवालामध्ये जखमा आणि भाजणे अशी मृत्युची कारणे आहेत. विमानात तेल वाहून नेले जात नव्हते. विमानाच्या राखेत स्फोटसदृश्य काही आढळले नाही. कॉकपीटचा विदा प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेतली जात आहे. बारामतीच्या धावपट्टीवरील पट्टे अंधुक झालेले होते, असे फडणवीस यांनी विमान अपघातासंदर्भात स्पष्टीकरण दिले.
