मुंबईत ग्रंथाली तर्फे प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम गुरुवारी पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी आपल्या खास शैलीत भाषणं करत जोरदार राजकीय टोलेबाजी केली.
याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंबरोबर बंद दाराआड चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, आता ठाकरे बंधूंबरोबर कथित बंद दाराआड नेमकं काय चर्चा झाली? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: माध्यमांशी बोलताना खुलासा केला आहे. आमच्यात बंद दाराआड कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
“मुंबईतील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान तुमची आणि ठाकरे बंधूंची बंद दाराआड राजकीय चर्चा झाल्याचं बोललं जात आहे असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राच्या हास्यरेषा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. महाराष्ट्रातील जे व्यंगचित्रकार आहेत, अशा १०० वर्षातील ७५ व्यंगचित्रकारांवर हे पुस्तक होतं. त्या कार्यक्रमाला आम्ही तिघेही (देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) साहित्यप्रेमी म्हणून गेलो होतो. त्यामुळे त्या ठिकाणी जी भाषणं झाली, ती विनोद फुलवणारी भाषणं होती. मला असं वाटतं की यातून महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. मग आमचे विचार काही असले, किंवा आम्ही राजकीयदृष्ट्या एकमेकांवर टीका करत असलो, तरी देखील आम्ही अशा कार्यक्रमात एकत्र येऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशाच प्रकारची संस्कृती महाराष्ट्राला अपेक्षित आहे”, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ठाकरे बंधूंबरोबर बंद दाराआड काय चर्चा झाली?
“आम्ही कार्यक्रमात एकत्र आलो याला कुठलाही राजकीय वेगळा अर्थ नाही. मी अशा बातम्या पाहिल्या की आमची तिघांची बंद दाराआड चर्चा झाली वैगेरे. पण बंद दाराआड कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नाही. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येण्यापूर्वी आम्ही सर्वजण वेटिंगरूममध्ये बसलो होतो. कार्यक्रमाचा वेळ झाल्यानंतर आम्ही सर्वजण व्यासपीठावर आलो. त्यामुळे आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आमच्यात अतिशय हलकी फुलकी चर्चा झाली. त्यामुळे त्यातून कोणतेही अन्वयार्थ काढू नये”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
