Devendra Fadnavis महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज विठ्ठलाची सपत्नीक महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी म्हणजे आनंदाचा सोहळा. लाखो वारकरी राज्यभरातून पालखी आणि दिंडी घेऊन पंढरपूरच्या दिशेने जात असतात. आषाढीच्या दिवशी पालख्या पंढरपूरमध्ये येऊन थांबतात. वारकरी डोळे भरुन कळसाचं दर्शन घेतात त्यानंतर आपल्या घरी परतत असतात. दुसऱ्या वारीची ओढ मनात घेऊन ती पावलं परत फिरतात. या खास अशा आषाढी सोहळ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रधर्म हा पॉडकास्ट सुरु केला आहे. वारी ही महाराष्ट्राची चालतीबोलती संस्कृती आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट?

एक नवी सुरुवात करतोय… ‘महाराष्ट्रधर्म’ ही नवी पॉडकास्ट मालिका आणि नवे काही सुरू करण्यासाठी आषाढी एकादशीपेक्षा दुसरा कोणता पवित्र दिवस असेल? पाहायला विसरू नका उद्या, रविवारी दि. ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता माझ्या सर्व समाजमाध्यमांवर !

देवेंद्र फडणवीस वारीबाबत काय म्हणाले?

“वारी म्हणजे कुठलाही इव्हेंट नाही. वारी ही आपली चालती बोलती संस्कृती आहे. एक अखंड स्मृती आहे. जी महाराष्ट्राचा आत्माभिमान जपते. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या परकिय आक्रमणांना न जुमानता, जिझिया कराचा जाच न बाळगता पावलं विठूरायाच्या दिशेने जात राहिली. वारी ना इस्लामी राजवटीत थांबली ना इंग्रजी आक्रमणात थांबली अशी ही आपली परंपरा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही सत्तेसाठी लढाई केली नाही. ते ध्येयासाठी लढले, देव-देश आणि धर्म यासाठी छत्रपती शिवाजी महाराज लढले. असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे. आता मुलाखतीत ते आणखी कुठल्या मुद्द्यांना स्पर्श करतील ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.

आषाढीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची महापूजा

देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त आज पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी पत्नी अमृता आणि कन्या दिवीजा यांच्यासमवेत शासकीय महापूजा करण्याचे सौभाग्य लाभले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले आणि विठुमाऊली व रखुमाईच्या चरणी नतमस्तक होत राज्यातील शेतकरी, कष्टकरी व सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रार्थना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंढरपूरमध्ये वारकऱ्यांचा मेळा

आषाढी एकादशीचा आनंदोत्सव पंढरपूरमध्ये साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.