“भारत हा महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूल्यांवर आणि संविधानावर चालणारा देश आहे. मात्र, ‘कॉक्रोच जनता पार्टी’ देशात केवळ अराजकता पसरवण्याचे काम करत आहे,” अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘न्यूज१८ रायझिंग भारत समिट’मध्ये बोलताना विरोधकांवर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
काँग्रेस आणि CJP ची विचारसरणी एकच
फडणवीस पुढे म्हणाले की, “CJP हा केवळ एक संघटना नसून ती एक विशिष्ट विचारसरणी आहे. भारतीय जनता पक्षासाठी हे कोणतेही मोठे आव्हान नाही. काँग्रेस आणि CJP हे दोघेही एकाच विचारसरणीने काम करत आहेत.”
‘रेजिम चेंज’ अन् जहाल डाव्या विचारसरणीचा आरोप
शेजारील देशांमधील घडामोडींचा संदर्भ देत फडणवीस यांनी अत्यंत गंभीर इशारा दिला. “सध्या देशात अति-डावी किंवा जहाल डावी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे लोक केवळ सत्ता बदलाची भाषा करत नाहीत, तर बांगलादेश आणि नेपाळची उदाहरणे देऊन थेट संपूर्ण राजकीय व्यवस्थाच उलथवून टाकण्याची भाषा करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. ज्यांचा संविधानावर आणि लोकशाही मूल्यांवर विश्वास आहे, ते सर्व नागरिक या अराजकतावादी विचारांना निश्चितच विरोध करतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अभिजीत दिपकेंचे उत्तर काय?
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
दिपके यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांत १३,९०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सध्या राज्य दुष्काळाशी झुंज देत असून अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आधी या गंभीर प्रश्नांकडे लक्ष द्या. CJP वर नंतरही बोलता येईल.”
