केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांना मिळणाऱ्या प्राप्तिकर नोटीसबाबत मोठा निर्णय घेतला. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले आहेत. तसेच प्राप्तिकर नोटिसांचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न त्वरेने निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी दिलेला शब्द पाळला. मागील ३५ वर्षांपासून साखर उद्योगावर जे आयकर विभागाचं संकट होतं ते दूर करत आज (७ जानेवारी २०२२) त्याबाबतचं नोटीफिकेशन जारी केलं. यासाठी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील आणि मी स्वतः अमित शाह यांना भेटलो होतो.

“शेतकऱ्यांना अधिक पैसे देणाऱ्या साखर कारखान्यांकडून ९,००० कोटी रुपयांची वसूली”

“आम्ही अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत गेल्या ३५ वर्षे शेतकऱ्याला ज्याने जास्त पैसे दिले अशा साखर कारखान्यांवर आयकर विभागाची टांगती तलवार लटकलेली असल्याचं त्यांच्या लक्षात आणून दिलं. शेतकऱ्याला अधिकचे पैसे दिले म्हणून अशा साखर कारखान्यांकडून ९,००० कोटी रुपयांची वसूली करण्यात येत आहे. हा एक प्रकारचा अन्याय आहे. या भेटीत अमित शाह यांनी सरकार यावर निर्णय करेल असं सांगितलं होतं. त्यांनी अतिशय तडकाफडकी हा निर्णय घेतला,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘त्या’ प्रकरणावरून देवेंद्र फडणवीसांना न्यायालयाची नोटीस; मुख्यमंत्रीपदी असताना घेतलेला निर्णय भोवणार?

“यामुळे साखर कारखानदारीला मोठा फायदा होणार आहे. वर्षानुवर्षाच्या या मागण्या रद्द होतील आणि शेतकऱ्यांना अधिकचा पैसा देण्यासाठी साखर कारखान्यांना अधिकचा फायदा मिळणार आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on decision of amit shah on sugar factory and income tax notices pbs
First published on: 07-01-2022 at 20:30 IST