गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर
शहरातील खून, चोरी, घरफोडया, सोनसाखळी चोरी, तोतया पोलिसांकडून फसवणूक अश्या विविध प्रकारच्या गुन्ह्य़ांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी, झोपडपट्टय़ांची तपासणी, सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, पायी गस्त, मोहल्ला समिती, शांतता समितीच्या बैठका यांसारखे प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
शहरात विविध गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याबाबतचा तारांकित प्रश्न डॉ. अपूर्व हिरे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.या प्रश्नाच्या उत्तरात फडणवीस यांनी माहिती दिली. जानेवारी २०१७ मध्ये खून, दुचारी चोरी, घरफोडी, खून यासारखे ८६ गुन्हे दाखल होते, तर जानेवारी २०१८ मध्ये ८४ गुन्हे दाखल झाले. राजीव नगर झोपडपट्टीजवळ २७ डिसेंबर २०१७ रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांचा खून झाल्याप्रकरणी पाच संशयित आणि एका विधीसंघर्षीत बालकास अटक करण्यात आली असून या गुन्ह्य़ाचा तपास सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २७ डिसेंबर २०१७ रोजी जुन्या भांडणाच्या कारणावरून खून झाल्याप्रकरणी आठ संशयितांना अटक करण्या आली आहे. याशिवाय महात्मा नगर भागात सात जानेवारी २०१८ रोजी घरफोडी प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात २१ लाख ३५ हजार रूपयांचा ऐवज चोरीला गेला असून त्यापैकी ११ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.