खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलंय.

खातेवाटप कधी होणार? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
देवेंद्र फडणवीस (संग्रहित छायाचित्र)

शिंदे-फडणीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, त्यानंतरही अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यामुळे महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून या मुद्द्यावर भाजपा-शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. खातेवाटप झाला नसल्याने राज्यातील अनेक प्रश्नांवर निर्णय प्रलंबित असल्याचाही आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर खातेवाटप कधी होणार असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी वर्ध्यात माध्यमांशी बोलताना प्रत्युत्तर दिलंय.

खातेवाटपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खातेवाटप लवकरच होईल. काळजी करू नका. लवकरच तुम्हाला माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, तुम्ही दिवसभरात अनेक वेळेला खातेवाटप करत आहात. आम्ही पेपर फोडला, तर तुम्हाला काम मिळणार नाही.”

यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुंबई मेट्रो कारशेडवरून होणाऱ्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “कांजूरमार्गची जागा एका डेपोसाठी आधीपासूनच मागितली गेली आहे. मात्र त्याचा वाद असल्याने ते प्रकरण हायकोर्टात सुरू आहे.मेट्रो कारशेडची जागा मेट्रो ३ करिता मागितलेली आहे.कांजूर मार्गची जागा मेट्रो ६ साठी मागितली आहे.”

“कांजूरमारची जागा मेट्रो ३ साठी योग्य नाही हे आमच्या काळातील कमिटीने आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसीएस सौनिक यांच्या उच्चस्तरीय समितीनेही स्पष्ट अहवाल दिला होता की, कारशेड आरेमध्येच योग्य आहे. ते कांजूरमार्गमध्ये नेलं, तर प्रचंड खर्च वाढेल आणि चार वर्षांचा उशीर होईल,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

फडणवीस म्हणाले, “मला असं वाटतंय उद्धव ठाकरेंनी फक्त अहंकारासाठी (इगो) कांजुरमार्गाचा आग्रह धरला. मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये एकही झाड कापायची गरज नाही. कार शेडचे २९ टक्के काम पूर्ण झाले आहे.”

हेही वाचा – ‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत? एकनाथ खडसे म्हणाले “आता वाट पाहू नका, थेट…”

“एकूण प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे चार वर्ष प्रकल्प थांबवून १५-२० हजार कोटी रुपयांनी किंमत वाढवणे योग्य नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. हे पैसे जनतेच्या खिशातील पैसे आहे आणि हे अशा पद्धतीने आम्ही वाया जाऊ देणार नाही,” असा इशारा फडणवीसांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis comment on portfolio distribution of shinde fadnavis government pbs

Next Story
‘मंत्रीपदासाठी मी पात्र नसावी’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यामुळे भाजपा अडचणीत? एकनाथ खडसे म्हणाले “आता वाट पाहू नका, थेट…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी