Devendra Fadnavis Rahul Gandhi Counter speech : नागपुरात महायुतीच्या वतीने महापदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अशी घोषणा देत भाजपाने शक्तिप्रदर्शन केलं. भाजपा महायुतीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या पदयात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सहभागी झाले आहेत. यशवंत स्टेडियम येथून संविधान चौकापर्यंत ही पदयात्रा काढण्यात आली. त्यापूर्वी यशवंत स्टेडियमवर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. “आता लढाई संसदेत नाही, रस्त्यावर होणार,” असं राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा संदर्भ देत फडणवीस यांनी संविधान असेपर्यंत लढाई संसदेतच होईल; मात्र रस्त्यावर लढण्याची वेळ आली तर त्यासाठीही आम्ही तयार आहोत, असं म्हटलं.
‘संविधान असेपर्यंत लढाई संसदेतच होईल’
फडणवीस म्हणाले, “राहुल गांधी, तुम्ही म्हणाला होता की, आता लढाई संसदेत नाही, तर रस्त्यावर होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे, तोपर्यंत लढाई संसदेतच होईल. पण रस्त्यावर लढण्याची वेळ आली, तर त्यासाठीही आम्ही कमी नाही, हे दाखवण्यासाठी आज आम्ही एकत्र आलो आहोत.”
यावेळी त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याचा इशाराही दिला. “आम्ही रस्त्यावर लढण्यासाठीही तयार आहोत. तुम्ही एक जण याल तर आम्ही एक हजार येऊ, तुम्ही हजार जण याल तर आम्ही एक लाख येऊ आणि तुम्ही लाखाने याल तर आम्ही एक कोटी लोक येऊ. हा भारताची हुंकार आहे,” असं फडणवीस म्हणाले.
‘ही लढाई भाजपाची किंवा एनडीएची नाही, संविधानासाठी आहे’
आपली लढाई केवळ भाजपाची किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नसून देशाच्या संविधानासाठी आहे, असेही फडणवीस म्हणाले. संविधानाच्या संरक्षणासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी महायुतीचे घटक पक्ष एकत्र आल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान नागपुरातील या महापदयात्रेच्या माध्यमातून भाजपाने ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ असा संदेश देत विरोधकांच्या भूमिकेवर टीका केली. फडणवीस यांच्या राहुल गांधींवरील विधानामुळे या पदयात्रेतील भाषणाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
