ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राला मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. तसेच मध्य प्रदेशने जे केलं ते आम्ही मागील २ वर्षांपासून करायला सांगत आहे, असंही नमूद केलं. ते नवी दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेशच्या आधी न्याय मिळू शकला असता, कारण मध्य प्रदेशने जे केलं ते करा म्हणून आम्ही मागील २ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारला सांगत आहे. मात्र, राज्य सरकारने केवळ टाईमपास केला. कमिशन तयार केलं त्याला पैसे दिले नाहीत.”

“मध्य प्रदेशने जो रिपोर्ट ६ महिन्यात तयार केला तो महाराष्ट्राला…”

“कमिशनने स्वतः सांगितलं की आम्हाला एक पैसा दिला नाही, स्टाफ दिला नाही. त्यामुळे मध्य प्रदेशने जो रिपोर्ट ६ महिन्यात तयार केला तो महाराष्ट्राला २ वर्षे तयार करता आला नाही. न्यायालयाने कालही हेच सांगितलं की महाराष्ट्रासह ज्या राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे त्या राज्यांनी रिपोर्ट तयार करावा आणि ओबीसी आरक्षण द्यावं,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं.

२०२४ च्या तयारीसाठी ज्ञानवापीचा मुद्दा असल्याची राऊतांची टीका, फडणवीस म्हणाले….

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. ते म्हणाले, “संजय राऊत रोजच टीका करतात. त्यांनी आम्ही महत्त्व देत नाही. तो महत्त्वाचा माणूस नाही.”

“न्यायालय जो निर्णय देईल तो अत्यंत महत्त्वाचा असेल”

“ज्ञानवापीच्या राजकीय परिणामांचा आम्ही विचार करत नाही. हा श्रद्धेचा विषय आहे. श्रद्धेचा विषय राजकारणाच्या पलिकडील असतात. देशात हे विषय न्यायालयाच्या माध्यमातून सोडवले जात आहेत. ही देखील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. न्यायालयाने आज कोर्ट कमिशनर नियुक्त केला. त्यांचा जो रिपोर्ट येईल त्यावर न्यायालय जो निर्णय देईल तो अत्यंत महत्त्वाचा असेल,” असं फडणवीस यांनी सांगितलं.

“हे प्रकरण न्यायालयात असल्याने आपण त्यावर फार वाद करणं योग्य नाही. मात्र, हे खरंच आहे. आपल्या सर्वांना हा इतिहास माहिती आहे की कशाप्रकारे मंदिरांवर आक्रमणं करून औरंगजेबाने ते मंदिर कसं तोडलं होतं,” असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे यांना मागच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं होतं. आता संभाजीराजेंना भाजपाचा पाठिंबा द्यायचा की नाही याचा राज्यस्तरावर होत नाही, तो केंद्रीय स्तरावर निर्णय होईल. त्यामुळे याबाबत जो योग्य निर्णय असेल तो सांगू.”

हेही वाचा : राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मोदींनी…”

“भाजपाचे राज्यसभेत दोन खासदार अगदी स्पष्टपणे निवडून येतात. आमच्याकडे मतं आहेत, आणखी एक उमेदवार निवडून येऊ शकतो. या संदर्भातील भाजपाचे सर्व निर्णय आमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून घेऊ,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.