Devendra Fadnavis : देशात जर पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली, तर त्याचे सुवर्णपदक शरद पवार यांना मिळेल, अशी खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडीबाबत कुठेही सहानुभूती नसून काही लोकांद्वारे केवळ सहानुभूतीचा डंका वाजवला जातो आहे, असे ते म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज 'मुंबई तक' या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष फुटण्याबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली. हेही वाचा - देवेंद्र फडणवीस आरक्षण देणार नसतील तर त्यांच्याशी भांडण करावे लागेल – मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? “मी पुन्हा आलो, पण यावेळी दोन पक्ष फोडून आलो, असं मी एकदाच बोललो होतो. आणि तेही गंमतीने बोललो होते. खरं तर अशाप्रकारे कोणीही कोणाचे पक्ष फोडू शकत नाही. दोन्ही पक्षा त्या त्या पक्षांतील नेत्यांमुळे फुटले. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत आणि अजित पवार यांना राष्ट्रवादीत त्यांचे भविष्य दिसत नसल्याने ते पक्षातून बाहेर पडले”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “.तर शरद पवारांनी सुवर्ण पदक मिळेल” पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. “मुळात शरद पवार यांनी आतापर्यंत सगळ्यात जास्त पक्ष फोडले. पक्ष फोडण्याचा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. देशामध्ये पक्ष फोडण्याची स्पर्धा घेतली, तर शरद पवार यांना सुवर्णपदक मिळेल”, असा टोला त्यांनी लगावला. “मविआबद्दल राज्यात सहानुभूती नाही” पुढे बोलताना, “लोकसभ निवडणुकीत शरद पवार यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती होती, असं वाटत नाही. फक्त माध्यमांतील काही लोकांनाच त्यांच्याबद्दल राज्यात सहानुभूती असल्याचं वाटतं. तेच लोक सतत सहानुभूतीचा डंका वाजतवत असतात”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच “राज्यात त्यांच्याबद्दल सहानुभूती असती, तर बीडची जागा त्यांनी फक्त ६ हजार मतांनी जिंकली नसती. ती जागा त्यांनी मतांचं ध्रुवीकरण करून जिंकली”, असेही ते म्हणाले. हेही वाचा - भाजप लोकसभेत ‘मविआ’तील तीन पक्षांसह ‘या’ चौथ्याविरोधात लढला – देवेंद्र फडणवीस “लोकसभेत शरद पवारांनी अनुभवाने जागा निवडल्या” “लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी अतिशय अनुभवाने आपल्या जागा निवडल्या आणि त्याचं श्रेय त्यांना द्यावंच लागेल. कुठे सरकारविरोधात वातावरण आहे, त्याचा अभ्यास करूनच त्यांनी जागा लढवल्या. विधानसभा निवडणुकीतही ते कमी आणि मोजक्याच जागा लढवतील, असं वाटतं”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.