नागपूर : मध्यप्रदेशातील इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या विशेष कार्यक्रमातून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी शनिवारी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राहुल गांधी मंचावर उपस्थित असतानाच स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीची नक्कल करीत स्टँड़अप कॉमेडीचा प्रकार केला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी नागपुरात राहूल गांधी यांना टोला लगावला.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

नागपूर, बुटीबोरी येथे उद्योजकांसोबत संवाद पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमासोबत संवाद साधला. यावेळी माध्यमांनी राहूल गांधी यांच्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमाकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मला वाटते की आता राहुल गांधींकडे हेच काम शिल्लक आहे. त्यांनी स्टँड अप कॉमेडीचे काम हाती घेतले आणि मिमिक्री केली तर त्यांना चांगला रोजगार मिळू शकेल. पक्षाला त्यांनी बेरोजगार केले आहेच, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

समृद्धी महामार्गाला समांतर रेल्वे

यावेळी समृद्धी महामार्गाला समांतर रेल्वे सुरू होण्याचे स्पष्ट संकेत दिले. ते म्हणाले, समृद्धी महामार्गाला समांतर रेल्वेच्या विस्तृत आराखड्यावर काम सुरू आहे. महाराष्ट्र रेल कंपनीला आराखड्याचे काम देण्यात आले आहे. समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला, त्याचवेळी रेल्वे मार्गासाठी जागा सोडली आहे. आता मालवाहू रेल्वेचीही गरज आहे. ‘जेएनपीटी’वरून नाशिक, जालना ते वर्धा येथील ड्राय पोर्टपर्यंत व येथून गडचिरोलीपर्यंत समर्पित मार्ग तयार केला जाईल. याचा संपूर्ण महाराष्ट्राला लाभ होईल, राज्यात उद्योग वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यूपीआय व्यवहारावर शुल्काबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री?

पेट्रोलपंप मालकांनीही यूपीआयवरील शुल्क वाढीला विरोध केल्याकडे माध्यमांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी भूमिका घेणे अयोग्य आहे. यूपीआयमुळे त्यांचा व्यवसाय वाढला आहे. सामान्य नागरिकही त्याचा वापर करीत आहे. यूपीआयवरील शुल्क अतिशय नाममात्र आहे. संसदेच्या समितीने या शुल्काची शिफारस केले असून त्यात ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यासह काँग्रेसचे चार मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. हे शुल्क सर्वांवर नाही. परंतु त्याविरोधात वातावरण निर्माण केले जात आहे. आज देशात व्यापार वाढला, भ्रष्टाचार कमी झाला, या मागे यूपीआय आणि डिजिटल व्यवहार आहे, हे समजून घेतले पाहिजे. नाममात्र शुल्क देण्याबाबत व्यापारी किंवा पेट्रोल पंप वाल्यांनी विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी प्रयत्न

मुंबईसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. कोस्टर रोड, टनेल्स, उड्डाणपूलाचे जाळे उभारण्यात येत आहे. मुंबईची जीवनदायिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेलाही पुढील २-३ वर्षात मेट्रोसारखे कोचेस लावण्यात येईल. त्यामुळे मुंबईचा संपूर्ण कायापलट होत आहे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेला दहा-बारा वर्ष त्याला लागतील. परंतु त्याची सुरुवात आम्ही केली असल्याचे ते म्हणाले.