Devendra Fadnavis reaction on daughter’s Career : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ: पिक्सल्स एंड प्ले’ आणि ‘ग्लोबल ईस्पोर्टस गेम्स फायनल्स’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक कॉन्टेट क्रिएटर्स आणि इन्फ्युअन्सर्सशी गप्पा मारल्या. या क्षेत्रातील विविध मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच, काही कंटेंट क्रिएटर्सनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तरे दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की विद्यार्थ्यांना गेमिंग, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये करिअरची स्पष्ट दिशा मिळावी यासाठी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) स्थापन करण्यात आली आहे. हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील ७०% गावांमध्ये फायबर नेटवर्क पोहोचले असून, पुढील २ ते ३ वर्षांत प्रत्येक गावात हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होईल, ज्यामुळे गेमर्सना ‘लॅग-फ्री’ अनुभव मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुलीला गेमिंगमध्ये करिअर करायला परवानगी द्याल का?
यावेळी जस्ट निल थिंग्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या नील साळेकर याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की तुमच्या मुलीने ठरवलं आणि तुम्हाला सांगितलं की तिला गेमिंगमध्ये करिअर करायचं आहे तर तुमची परवानगी असेल का?
…तर मी तिचा पहिला सबस्क्रायबर असेन
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शंभर टक्के परवानगी असेल. ती जे काही करेल यासाठी माझा पूर्णपणे पाठिंबा असेल. जर तिने काही कंटेट क्रिएट केला तर तिचा पहिला सबस्क्रायबर मी असेन. मी निश्चिंतपणे तिला सांगेन की कोणतंही करिअर केलं तरी त्यात मेहनत महत्त्वाची असते.”
अथर्व सुदामेने काय विचारलं?
आता एवीजीसी (AVGC – Animation, Visual Effects, Gaming, and Comics) सेक्टर खूप मोठं होतंय. पण विद्यार्थ्यांना तरीही प्रश्न असतो की पुढे जाऊन काय करायचं? त्यांच्यासमोर मेडिकल किंवा इंजिनिअरिंग असेच पर्याय असतात. त्याकरता सरकार विद्यार्थ्यांचा पाथ क्लिअर होईल याकरता काही कोर्स उपलब्ध करता येतील का? असा प्रश्न अथर्व सुदामे याने विचारला.
त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आपल्याकडे क्रिएटर्स इकॉनॉमी तयार होतेय. आपल्याकडे युथ मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे. पण फॉर्मल शेप शैक्षणिकदृष्ट्या देऊ शकलो नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार, आयआयटीप्रमाणे आयआयसीटी सुरू झालं म्हणजेच इंडियन इन्स्टिट्युशन ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ((IICT)). हे आपलं एक हब आहे. की जे अशाप्रकारचे क्रिएटर्स इकॉनॉमीमध्ये जे ट्रेनिंग लागतं अशा सर्व गोष्टींची इकोसिस्टिम तयार करेल. हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून दिले जाईल.
