मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर पुण्यात आयोजित ‘तिरंगा रॅली’नंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची ठामपणे पाठराखण केली. यासोबतच, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका करणाऱ्यांना प्रत्युत्तर देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले.

“सरकार संविधानाने चालते, दबावाने नाही” – मुख्यमंत्री

मनोज जरांगे यांनी महसूलमंत्र्यांवर केलेल्या आरोपांबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी अत्यंत स्पष्टपणे सांगतोय… सरकार हे संविधानानुसारच चालते, ते कुठल्याही दबावाने चालत नाही. मात्र, सरकार प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेण्यास नेहमी तयार असते. आमच्या सरकारने मराठा समाजासाठी जे ऐतिहासिक काम केले आहे, ते आजवर इतर कुठल्याही सरकारने केलेले नाही.”

“केवळ ओबीसी मंत्री म्हणून टार्गेट करणे अयोग्य”

बावनकुळे यांच्यावर झालेल्या आरोपांवर अधिक स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्री म्हणाले, “कोणत्याही मंत्र्याकडे एखादी तक्रार आल्यास त्याची योग्य चौकशी करणे ही संविधानाने मंत्र्यावर सोपवलेली जबाबदारी असते. मराठा आरक्षण प्रकरणी गठीत करण्यात आलेली समिती ही संपूर्णपणे पुराव्यांच्या आधारावर काम करते. ही समिती सरकारला बांधील नसून ती केवळ न्यायालयाशी बांधील आहे; ती सरकारला रिपोर्ट सादर करत नाही. त्यामुळे एखादा मंत्री केवळ ‘ओबीसी (OBC)’ समाजाचा आहे म्हणून त्याला अशा प्रकारे टार्गेट करणे योग्य नाही. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.”

मुख्यमंत्र्यांनी पुढे ठामपणे सांगितले की, चंद्रशेखर बावनकुळे यांनी काहीही हेतुपूर्वक केलेले नसून, त्यांनी एक मंत्री म्हणून आपले घटनात्मक कर्तव्य पूर्ण केले आहे.

सुनेत्रा पवारांच्या इंग्रजी भाषणावर कौतुकाची थाप

पत्रकारांनी जेव्हा सुनेत्रा पवार यांनी नुकत्याच केलेल्या इंग्रजीतील भाषणाबद्दल मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया विचारली, तेव्हा ते म्हणाले, “सुनेत्रा वहिनी नेहमी अत्यंत आत्मविश्वासाने (कॉन्फिडंटली) बोलतात. काही लोक मात्र मुद्दाम डोळ्यांवर पट्टी बांधून बसले आहेत आणि त्यांचे विचार बुरसटलेले आहेत. स्वर्गीय अजितदादानंतर वहिनींनी ज्या सक्षमतेने उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे, तेच त्यांच्यावर विनाकारण टीका करणाऱ्यांसाठी चोख उत्तर आहे.”