मुंबई: भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी सुवर्ण मंदिर परिसरातील ऑपरेशन ब्लू स्टार विषयी केेलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली आहे.

शीख धर्मीयांचे नववे गुरू यांच्या ३०० व्या शहीद दिनानिमित्त राज्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्राला गौरविण्यासाठी निमंत्रण असल्याने मंत्री गिरीश महाजन पंजाबमध्ये त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तिथे मागे कोणाचे छायाचित्र आहे तसेच गुरुमुखीमध्ये नेमका काय संदेश आहे याची त्यांना कल्पना नव्हती. तिथे त्यांनी शिख समाजाचा गौरव केला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पाठराखण केली.

काँग्रेसने पंजाबमध्ये शिखांवर केलेल्या अत्याचाराचा निषेध आम्ही कायम करू. शिखांचा कतलेआम काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळात झाले हे सत्य विसरता येणार नाही, असे सांगताना गिरीश महाजन हे पंजाबमधील कार्यक्रमात अत्यंत थोडावेळ होते. तिथे त्यांनी शिख समाजाचा गौरव केला. भारताच्या वाटचालीत शिख समाजाचे योगदान मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरिता भारत सरकारने दिलेले योगदानाविषयी त्यांनी माहिती दिली. तेथील अंमली पदार्थांच्या वाढत्या प्रश्नावर वक्तव्य केले असे ते म्हणाले. यावेळी महाजन यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारले असता गिरीश महाजन यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले आहे, त्यापेक्षा जास्त स्पष्टीकरणाची गरज नसल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय नेतृत्वाची नाराजी

गिरीश महाजन यांच्या या कार्यक्रमातील सहभागावर आणि त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रतन शारदा यांनी महाजनांना पंजाबचा इतिहास आणि खलिस्तानी दहशतवादाची खरोखरच जाण आहे का, असा संतप्त सवाल केला आहे. त्यांनी एक्सवरील आपल्या संदेशात अत्यंत नम्रपणे मी गिरीश महाजन यांना विचारू इच्छितो की, त्यांना खरोखरच पंजाबचा इतिहास किंवा खलिस्तानी दहशतवाद माहित आहे का? आम्ही तो काळ अनुभवला आहे. भिंद्रनवालेच्या काळात जवळपास ३० हजार हिंदू आणि ५० हजार शिखांच्या हत्या झाल्या, मात्र संघ किंवा भाजप त्यांच्यासमोर कधीही झुकला नाही. कृपया आपण महाराष्ट्रात परत जावे आणि पंजाब भाजप तसेच शीख-हिंदू संबंध खराब करू नयेत, असा सल्ला शारदा यांनी दिला.